Phaltan Doctor Case : चारित्र्यहनन नेमकं कशासाठी? फडणवीसांची निंबाळकरांना क्लीनचीट पण मुंडेंचा रोख मात्र खासदारावरच!
फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदारांना क्लीन चिट दिली असली तरी, धनंजय मुंडेंनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मृत महिलेच्या चारित्र्यहननाचा मुद्दाही ऐरणीवर आला असून, राजकीय आशीर्वादामुळे तपासावर परिणाम होत असल्याचा आरोप होत आहे.
फलटणच्या सरकारी रुग्णालयात एका महिलेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी राज्यात राजकारण तापले आहे. या घटनेत माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र या प्रकरणात एका खासदाराचा संबंध असल्याचा पुनरुच्चार करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाच्या तपासात अटकेतील आरोपींपलीकडे जाऊन, या आरोपींना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. मृत महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी यापूर्वीच्या अशाच प्रकरणांमध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
