विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला पोलीस परवनागी नाहीच, कायदेशीर कारवाईची शक्यता
मुंबईत आज विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. याविरोधात भाजपने रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ मूक आंदोलन पुकारले आहे. विनापरवानगी मोर्चा काढल्यास पोलिसांकडून कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे रवाना होणार आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मूक आंदोलन पुकारले आहे.
विरोधकांचा सत्याचा मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महानगरपालिकेपर्यंत जाईल. हा मोर्चा संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील अनियमितता आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विनापरवानगी मोर्चा काढल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार असून, आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
या सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपने दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ मूक आंदोलन आयोजित केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, त्याला अमित साटम आणि लोढा हे नेते उपस्थित राहतील.