Ambadas Danve : सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू…दानवेंचा शिरसाट यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले …तर गाठोडे उघडू!
अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट यांना टि्वट करत प्रत्युत्तर दिले आहे. दानवेंनी दावा केला आहे की, सत्तारांच्या सिल्लोडमधील २५ पैकी १४ नगरसेवक मामू आहेत आणि त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला आहे. दानवे यांनी सत्तार यांच्या हिंदू देवतांबद्दलच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पूर्वीच्या आरोपांची आठवण करून दिली.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट यांना टि्वटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील निकालावरून हा नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. दानवे यांच्या मते, सत्तारांच्या सिल्लोडमधून शिंदेगटाचे पंचवीस नगरसेवक निवडून आले आहेत. या पंचवीस नगरसेवकांपैकी चौदा नगरसेवक हे मंत्री शिरसाट यांच्याच भाषेत मामू आहेत, असा आरोप दानवे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व विजयी उमेदवार भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
अंबादास दानवे यांनी सत्तार यांच्या हिंदू देवदेवतांबद्दलच्या सन्मानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, सत्तार हिंदू देवदेवतांचा किती सन्मान करतात हे सर्वांना माहीत आहे. दानवेंनी सूचक इशारा देत म्हटले की, जर शिंदेसेनेचे सत्तार यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत हे सांगायचे झाल्यास, आपण गाठोडे उघडू शकतो. सध्या शिंदेगटासाठी आपला तो पिंट्या, दुसऱ्याचं ते कार्टं असा खेळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
