Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधाना हिच्या लग्नासाठी सांगली सजली पण अचानक विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण….
स्मृती मानधनाचा विवाह संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी आज पार पडणार होता. मात्र, वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्मृतीने हा सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत विवाह सोहळा न करण्याचा स्मृतीचा निश्चय आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या सोहळ्याला अचानक ब्रेक लागला आहे. आज नियोजित असलेला तिचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा हृदयद्रावक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे कुटुंबियांना आणि तिच्या चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज, म्हणजेच ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी पार पडणार होता. मात्र, या आनंदाच्या प्रसंगापूर्वीच मानधना कुटुंबावर हे संकट ओढवले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नाश्ता करत असताना श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला ही सामान्य बाब वाटली असली तरी, त्यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याचे लक्षात येताच, कुटुंबाने कोणतीही जोखीम न घेता तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले. हा निर्णय वेळेत घेतल्यामुळे संभाव्य मोठी हानी टळली असावी.
