मोठी बातमी! सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगितीबाबत आला महत्त्वाचा आदेश

| Updated on: Sep 28, 2022 | 9:10 AM

जुलै महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती आणली होती. आता आलेल्या आदेशाने नेमकं काय होणार?

Follow us on

सुमित सरनाईक, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सहकारी संस्था (Co-Operative Sector) निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या सहकारी सोसायट्यांसह बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांवर स्थगिती आणण्यात आली होती. 30 सप्टेंबरपर्यत निवडणुका (Elections) घेऊ नये, असा स्थगिती आदेशही जारी करण्यात आला होता. दरम्यान, या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बुधवारी राज्य सरकारने (State Government) स्थगिती आदेश मागे घेत असल्याचं पत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केलं. त्याला खंडपीठानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे अखेर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. राज्यातील सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागांच्या मुख्य सचिवांनी 15 जुलै 2022 रोजी एक पत्र जारी केलं होतं. या पत्रानुसार 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे तशी ठेवण्याचे निर्देश दिले होते. हे निर्देश आता अखेर मागे घेण्यात आलेत. त्यामुळे आता राज्यात लवकरच सहकारी निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत.