मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यातल्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. भावे कुटुंबीयांनी विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी सुबोध भावेंनी डीजेला विरोध करत आवाज विरहित गणेशोत्सवाचं आवाहन केलं. बाप्पासाठी आतली श्रद्धा महत्त्वाची, उत्सव युद्धासारखा नसावा, असं ते म्हणाले.
अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यातल्या घरी मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भावे कुटुंबीयांनी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाची स्थापना केली असून, विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडला. या प्रसंगी सुबोध भावेंनी गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि शांत वातावरणावर भर दिला, तसेच डीजेच्या आवाजाला विरोध करत आवाज विरहित गणेशोत्सवाचं आवाहन केलं. भावेंनी स्पष्टपणे सांगितलं की, “हा उत्सव आहे, युद्ध नाहीये.” त्यामुळे तो उत्सवासारखाच साजरा व्हायला हवा. त्यांनी डीजेच्या गजरात बाप्पा पावतो, या समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या मते, गणपती बाप्पासाठी आतला आवाज म्हणजेच खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. जर मनात खरी श्रद्धा असेल, तर बाप्पाच्या भावना दुखवणारं कोणतंही कृत्य भक्त करणार नाहीत.
मोठ्या आवाजातील संगीत किंवा डीजे संस्कृतीमुळे उत्सवाचं पावित्र्य आणि शांतता भंग होते, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सुबोध भावेंच्या या संदेशामुळे शांततापूर्ण आणि पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या विचाराला बळ मिळालं आहे.
