गुरुजींचा प्रताप! पाण्याच्या बाटलीत दारू भरली अन् शाळेतच.. | VIDEO
बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा नवा प्रताप आता समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा नवा प्रताप आता समोर आला आहे. गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर दारू पिऊन शिकवण्याचा धक्कादायक प्रकार 21 जुलै रोजी उघडकीस आला आहे. सुधाकर कुलकर्णी असे या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रीपत अंतरवाला येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या या शाळेत 40 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दोन शिक्षक नियुक्त आहेत. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून एका शिक्षकाची दुसरीकडे बदली झाल्याने शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर चालत आहे. या एकमेव शिक्षक सुधाकर कुलकर्णी यांनी बिस्लेरीच्या बाटलीत दारू भरून वर्गात शिकवताना ती प्यायल्याचा प्रकार गावातील काही जागरूक नागरिकांनी उघड केला. उद्याची पिढी घडवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोरच दारू पिऊन शिकवण्याचा प्रयत्न केल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
