Thackeray Brothers Alliance : महायुती मुंबईसाठी तयार पण मुंबईबाहेर भाजप-शिंदे सेनेत खटके तर ठाकरे बंधूंचं जमलंय!
ठाकरे बंधू, उद्धव आणि राज ठाकरे, मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवण्यावर चर्चा करत आहेत. मनसेकडून मराठीबहुल जागांची मागणी होत आहे. दुसरीकडे, महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत जागावाटपावरून तीव्र मतभेद समोर येत आहेत.
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते. मनसेने 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकलेल्या 20 ते 25 जागांची मागणी केली आहे. विशेषतः दादर, माहीम, वरळी, शिवडी यांसारख्या मराठीबहुल भागातील जागांवर मनसे आग्रही आहे.
याच दरम्यान, महायुतीमध्ये मुंबई वगळता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर मोठे मतभेद उफाळून आले आहेत. ठाण्यात शिंदे गटाने एकला चलो रेचा नारा दिला, तर भाजपने चप्पा चप्पा भाजप अशी भूमिका घेतली. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील वाद थेट अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. महापालिकेत एकत्र सत्तेत असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.