Uddhav Thackeray : हिंदी सक्ती नको… उद्धव ठाकरेंचे थेट आदेश, ‘त्या’ GR ची होळी करा अन्…
मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी मोर्चा काढणार आहेत. राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणावर ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यातील शाळांच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून ठाकरे गटासह मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात काल पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी दुपारी 3 वाजता शिवसेनेच्या वतीने राज्यभरात हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तर हिंदी सक्ती विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि शालेय शिक्षण विभागाकडून हिंदी सक्तीचा जो GR काढण्यात आला आहे, त्या GR ची होळी करा, असे आदेशच उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले आहे. तर हिंदी भाषेला आपला विरोध नाही मात्र सक्तीला विरोध असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यासह आम्ही मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही, असंही स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
