Year Ender 2025: PM Kisan योजनेचा थेट लाभ, यंदा 19, 20 आणि 21 व्या हप्त्याने दिलासा
Year Ender 2025: वर्ष 2025 च्या अखेरीस कृषी क्षेत्राचा लेखाजोखा पाहता, अनेक बदल, अनेक घडामोडी घडल्या आहेत. हे वर्ष शेतकऱ्यांसाठी कसं राहिलं? शेतकऱ्यांना या वर्षात कोणता लाभ झाला आणि किती रुपये खात्यात आले याची माहिती जाणून घेऊयात..

PM Kisan Yojana Year Ender: आपल्या अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतकरी यांचे सर्वाधिक महत्त्व आहे. शेतकऱ्यांमुळे अनेक देशात आपल्या मातीत पिकवलेले धान्य जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शेतकरी देशात विविध पिकं पिकवतात. त्यातून देशाला आणि परदेशातही धान्य मिळते. देशातील कास्तकारांसाठी सरकार अनेक योजना राबवतात. त्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना(PM Kisan Yojana) ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करते. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन वेळा 2-2 हजार रुपये जमा करण्यात येतात. या वर्षात, 2025 मध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा तीन वेळा लाभ मिळाला आहे.
19 हप्ता वर्षाच्या सुरुवातीला झाला जमा
जे शेतकरी पीएम किसान योजनेशी जोडल्या गेले आहेत. त्यांना वर्षाच्या सुरुवातीला 19 व्या हप्ता प्राप्त झाला. 24 फेब्रुवारी 2025 रोजी जवळपास 9.8 कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांना या हप्त्यातंर्गत लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे हा हप्ता वळता करण्यात आला.
20 व्या हप्त्याची आनंदवार्ता
यंदा पावसाने कहर केला. अतिवृष्टीने उत्तर भारतामधीलच नाही तर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यावेळी 20 वा हप्ता देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जामा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्या दरम्यान एका कार्यक्रमात हा हप्ता थेट DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. 2 ऑगस्ट 2025 रोजी जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली.
21 व्या हप्त्यात ट्विस्ट
यंदा अनेक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. उत्तर भारतातील राज्यं आणि मध्य भारतासह दक्षिणेतील राज्यात पावसाचा कहर दिसला. त्यामुळे केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. तर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 वा हप्ता थेट बँक खात्यात वितरीत झाला.
स्टेट्स तपासण्यासाठी काय कराल?
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी पात्र आहेत की नाही हे स्टेटसवरुन तपासता येते. त्यासाठी शेतकऱ्यांना एक नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला आहे. आधार वा मोबाईल क्रमांकाआधारे हा रजिस्ट्रेशन क्रमांक सहज मिळवता येतो. Registration Number जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या साईटवर Know your Registration द्वारे शेतकऱ्यांना हा क्रमांक मिळतो. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर लाभार्थ्यांची यादी प्राप्त होते. येथे शेतकऱ्याचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवून Get Data वर क्लिक केले की पेमेंट स्टेट्स दिसून येते.
तर करा तक्रार
नियमीतपणे ई-केवायसी पूर्ण केलेले असेल तर लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होते.खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. या योजनेत अडचण अथवा तक्रार करायची असेल तर शेतकर्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा. pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तक्रार पाठविता येईल. पीएम-किसान हेल्प डेस्कच्या 011-23381092 (Direct Helpline) वर संपर्क साधता येईल.
