Maharashtra Political News LIVE : भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे ठाणे कार्यालयात
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 16 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे. पाचवा टप्पा हा महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा असणार आहे. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याच मतदान 20 मे रोजी होणार आहे. प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आज डोंबिवलीत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रचार दौरे आहेत. डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी येणार आहेत. कल्याण लोकसभेत ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे हे महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदानात जाहीर सभा घेणार आहेत.
तर एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदें यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत. दरम्यान ठाण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरे आज सभा घेणार आहेत. या सभेला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
संविधान चिरडण्याचे काम काँग्रेसने केले: अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले आहे की, संविधान चिरडण्याचे काम जर कोणी केले असेल तर काँग्रेसने केले, काँग्रेसनेच 62 पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती केली, राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकरांना पक्षातून हाकलून दिले, इतकेच नव्हे तर काँग्रेसने त्यांचा अपमान केला.
-
काँग्रेस-आरजेडी राममंदिराचा मुद्दा रखडवत, लटकत आणि वळवत राहिले: शाह
बिहारच्या सीतामढीमध्ये अमित शाह म्हणाले की, रामलला 500 वर्षांपासून तंबूत बसले होते. काँग्रेस आणि आरजेडीने राम मंदिराचा प्रश्न अनेक वर्षे रखडवला, पुढे ढकलला आणि वळवला. तुम्ही मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले, त्यांनी 5 वर्षातच केस जिंकली, भूमिपूजन केले आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठाही केली.
-
-
चार धाम यात्रेवर मुख्यमंत्री धामी यांची उच्चस्तरीय बैठक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये चार धामवर उच्चस्तरीय बैठक घेतली.
-
सपा सरकारमध्ये एक जिल्हा, एक माफिया होताः पंतप्रधान मोदी
उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सपा सरकारमध्ये एक माफिया असायचा. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या माफियांचे साम्राज्य होते. प्रत्येक जिल्ह्यात या लोकांनी एक-एक माफिया कंत्राटावर ठेवला होता. येथे व्यापारी सुरक्षित नव्हता. पण जेव्हापासून योगीजी आले आहेत आणि त्यांचे सहकारी सरकारमध्ये आहेत, तेव्हापासून सारे वातावरणच बदलून गेले आहे. आता जनता घाबरत नाही, माफिया घाबरतात.
-
विनोद तावडे-नरेश म्हस्के भेट
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे ठाण्यात भाजप कार्यालयात आले आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली तावडे यांना भेटायला लोकसभा शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आले. महस्के यांच्यासह आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, संजय वाघुले आणि सर्व महत्त्वाचे पदाधिकारी होते. तावडेनी म्हस्के यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
-
पोस्टर्स-बॅनर्स लावणं नियमबाह्य,निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा
शिवाजी पार्क मैदान परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स-कटाऊट्स हटवण्यात आले आहेत. असे पोस्टर्स आणि बॅनर्स लावणं नियमबाह्य असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मुंबईत शुक्रवारी 17 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
-
पंकजा मुंडे यांचे मोठे विधान
दिंडोरी मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना आपले आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवावे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
-
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे प्रशासनाला आदेश
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चोख नियोजन करा. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे प्रशासनाला आदेश.
-
पंकजा मुंडे भावी मंत्री म्हणून उल्लेख
मनमाडला दिलेली पाण्याची योजना लवकरच चालू होणार. आमच्याकडे उद्योग आणावेत. उत्तर महाराष्ट्रात ६० फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. शहराला ३५ कोटींचं क्रीडांगण, असे सुहास कांदे यांनी म्हटले. यावेळी सुहास कांदे यांनी पंकजा मुंडे यांचा भावी मंत्री म्हणूनही उल्लेख केला.
-
शंभुराज देसाई यांचे मोठे भाष्य
अनेक लोकांनी आतून आम्हांला मदत केली आहे. अनेक लोकांनी त्या गटातील आम्हाला मदत केली आहे. आज आम्ही त्यांची नाव सांगणार नाही पण ४ जूननंतर महायुतीमध्ये लोंढा येईल, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.
-
राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रत्येक भाषणातून टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या एकाच मंचावर पहिल्यांदाच येणार आहेत. त्यामुळे तोफेचे तोंड नेमकं कुणाकडे असणार आणि तोफ गोळे कुणावर पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे
-
शरद पवारांनी भाषण आवरले
शरद पवारांचे भाषण सुरू असताना वादळ सुटल्याने व्यासपीठावरील स्टेज मागील बॅनर पडला. शरद पवारांनी आपले भाषण थोडक्यात आवरलं.
-
सुमित वाघमारे हत्याकांड प्रकरणात दोघांना जन्मठेप
सुमित वाघमारे हत्याकांड प्रकरणात दोन आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. संकेत वाघ, बालाजी लांडगे या दोघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. गजानन क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. बहिणीसोबत प्रेम विवाह केल्याने सुमित वाघमारेची डिसेंबर 2018 मध्ये हत्या करण्यात आली होती.
-
रॅपर उतरले प्रचारात
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंसाठी धारावीचे रॅपर्स , गल्ली बॉईज यांचा अनोखा प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे. धारावीने विविध क्षेत्राला अनेक कलाकार दिले आहेत. याच धारावीतून अनेक रॅपर देखील बाहेर पडले. आता याच रॅपर्सच्या माध्यमातून राहुल शेवाळे धारावीत प्रचार करत आहे. घरोघरी जाऊन हे रॅपर्स राहुल शेवाळे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत.
-
पुणे पोलिसांनाच चोरट्यांचे आव्हान
पुण्यात ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चोरटयांनी पोलिसांसमोरच आव्हान उभे केले आहे. ३ पैकी एक दुचाकी पुण्यातील एका भागात आढळून आली. याप्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल नाही. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंग मधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
-
मोदींच्या सभेची जोरदार तयारी
मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वीस फूट इतके मोठे कट आऊट लावण्यात आले आहे. अनेक ठिकाणी होर्डिंग आणि बॅनर पोस्टर्स ने संपूर्ण परिसर गजबजला आहे.
-
देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसणार
31 मे रोजी मॉन्सून भारताची मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये दाखल होणार असून कालांतराने पुढील काही दिवसातच तो महाराष्ट्रात बरसेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरूच राहील. मात्र पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमान मध्ये दाखल होईल आणि त्याचा प्रवास 31 मे रोजी केरळ पर्यंत पोहोचेल. यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
-
सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल
चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल झाले आहेत. सयाजी शिंदे यांना फूड पॉयझनिंग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. सध्या सयाजी शिंदे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
-
नरेंद्र मोदींच्या रोड शोचा मुंबई-अहमदाबाद महामार्गाला फटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोचा मुंबई-अहमदाबाद महामार्गाला फटका बसला आहे. मुंबई परिसरात जाणाऱ्या येणारे मोठी वाहन नवी मुंबई, ठाणे परिसरातच थांबवून ठेवलेली वाहन एकाच वेळी रस्त्यावर आल्याने आज सकाळपासून महामार्ग ठप्प झाल्याची माहिती पोलीसांनी दिलीय. खणीवडे टोल नाका ते मनोर पर्यंत गुजरात लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 4 तासापासून गुजरात लेन वर वाहतूक ठप्प आहे. गुजरात लेन पूर्ण जाम तर मुंबई लेनवर धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्या मॅरॅथॉन बैठका
ठाण्याच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मॅरॅथॉन बैठका सुरु आहेत. स्वतः मुख्यमंत्री यांनी सकाळी 5 वाजेपर्यंतबैठका घेतल्या. कोणत्या विधानसभेतून नाही तर कोणत्या वॉर्डमधून किती लीड मिळणार याची खातरजमा केली जात आहे. नवी मुंबईतील बेलापूर पासून थेट मिरा भाईंदर पर्यंत प्रत्येक वॉर्डची चाचपणी केली. त्यावरून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, गीता जैन, नरेंद्र मेहता, पुर्वेश सरनाईक, हेमंत पवार असे सर्व आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर संदीप नाईक आणि संजीव नाईक यांच्या सोबत आज बैठक होणार आहे.
-
श्रीकांत शिंदे यांची पत्रकार परिषद
कल्याण लोकसभेत उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली जिमखान्यात पत्रकार परिषद होत आहे. श्रीकांत एकनाथ शिंदे वचननामा प्रकाशित करणार आहेत. कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे, भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांतकांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत.
-
देवाच्या नावाने घोषणा देऊन कांद्याला भाव मिळत नाही – अमोल कोल्हे
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून दिल्लीचे तक्त पलटी केले. देवाच्या नावाने घोषणा देऊ कांदा भाव मिळत नाही. अशी टीका अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
-
नाशिकमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर दाखल होताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. पण त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
-
श्रीकांत शिंदे यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून नाव दिल पाहिजे – आनंद परांजपे
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार केला. पंतप्रधान मोदींची ही जाहीर सभा झाली. त्याला ही उस्फुर्त प्रतिसात जनतेने दिला. या लोकसभा मतदारसंघामध्ये निधी व विकास कामं श्रीकांत शिंदे यांही केले त्यामुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून नाव दिलं पाहिजे. असं आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
-
उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने मनोज जरांगे यांची सभा रद्द
बीड : नारायण गडावरील सभेवर दुष्काळाचे सावट. मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द. भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय. पुढील बैठकीत सभेची तारीख होणार निश्चित.
-
निवडणुकीवरून 1 लाख रुपयांची पैज
सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी आणि मनसेचे लोकसभा अध्यक्ष यांच्यात निवडणुकीवरून 1 लाख रुपयांची पैज लागली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार की भाजपचे राम सातपुते यावरून ही पैज लागली आहे. भाजपचे राम सातपुते जिंकणार असा दावा करत मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी 1 लाख 1 हजार रुपयांची पैज लावली. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी 1 लाख 1 हजार रुपयांचा पैजेचा विडा उचलला आहे.
-
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज कोल्हापुर आणि शिर्डी दौऱ्यावर
कोल्हापुर- आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आज कोल्हापुर आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं. आई अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते शिर्डीला रवाना होणार आहेत. आई अंबाबाई आणि शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा आंध्रप्रदेशला परतणार आहेत.
-
भाजपला 220 पेक्षा कमी जागा मिळणार- अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले “भाजपला 220 पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचं ट्रेंडमध्ये दिसतंय. हरयाणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या जागा कमी होणार आहेत. भाजप नाही तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल.”
-
अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालिवाल यांच्या आरोपांवर उत्तर देणं टाळलं
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्या मारहाणीच्या घटनेविषयी प्रश्न विचारला असता उत्तर देणं टाळलं. तर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आहेत.”
-
केरळमध्ये 31 मे रोजी मोसमी पावसाचं आगमन
मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
-
शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप
पंढरपूर- शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप . सांगोला तालुक्यातून “तुतारीला” म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने नीरा उजवा कालव्याचे तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी बंद केल्याचा केला गंभीर आरोप त्यांनी केला.
-
विरार, नालासोपारा, वसईतील उत्तर भारतीय मतदारांना आता योगी आदित्यनाथ घालणार साद
विरार, नालासोपारा, वसईतील उत्तर भारतीय मतदारांना आता योगी आदित्यनाथ घालणार साद. हेमंत सावरा यांच्यासाठी योगी आदित्य नाथ यांची जाहीर सभा. 18 मे रोजी सकाळी 11.30 वाजता योगींची जाहीर सभा होणार. पालघर लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मते ठरतात निर्णायक
-
पुण्यातील जाहिरात होर्डिंग्ज बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल
पुण्यातील जाहिरात होर्डिंग्ज बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल. मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जाहिरात फलकांचा अहवाल मागवला. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचा अहवाल मागवला तसेच जाहिरात पालकांचे लेखापरीक्षण नव्याने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
-
नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या जेवणातून 55 जणांना विषबाधा
नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या जेवणातून 55 जणांना विषबाधा. नांदेडच्या लालवंडी गावातील घटना. विषबाधा झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
राज्यात लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात
राज्यात लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून प्रचार करणार . केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा व बैठका होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघर मध्ये जाहीर सभा होतील.
-
Marathi News: विजयाचे दावे-प्रतिदावे
मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. निकाला आधी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. देहूत प्रवेशद्वाराच्या जवळ खासदार संजोग वाघेरे अशा आशयाचे फ्लेक्स लागले आहेत.
-
Marathi News: रसायनयुक्त पाणी सोडल्यानंतर कारवाई
रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडल्याने भंगार गोदामाला पालिकेकडून टाळे लावण्यात आले. रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडून नदी प्रदूषण केल्याने महापालिकेने एका भंगार व्यावसायिकावर कारवाई केली आहे. भंगार व्यावसायिकावर पोलिसात गुन्हा नोंदवत भंगार गोदाम सील करण्यात आले आहे.
-
Marathi News: सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नद्या कोरड्या पडल्या असून तलावांनी तळ गाठला आहे. सोलापूर जिल्ह्यात 137 गावात दुष्काळी स्थिती असून 167 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
-
Marathi News: जरांगे याच्या महासभेवर दुष्काळाचे सावट
मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांची 8 जून रोजीची महासभा अडचणीत आली आहे. नारायण गडावर होणाऱ्या महासभेवर दुष्काळाचे सावट आहे. नारायणगड परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे सभेवर सावट आहे. 8 जून रोजी नारायण गडावर सभा घ्यायची की नाही यावर आज अंतिम निर्णय होणार आहे.
-
Maharashtra News : दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक
दुचाकी चोरणाऱ्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शुभम लोंढे, सचिन दळवी, यश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. आळंदी परिसरातून शुभम आणि सचिनला ताब्यात घेण्यात आलं. या चौकशीत यशच नाव समोर आलं. त्यालाही दरोडा विरोधी पथकाने अटक केली.
-
Maharashtra News : पुण्यात 85 होर्डिंग अनधिकृत
पुण्यात 85 होर्डिंग अनधिकृत. 349 होर्डिंगच स्ट्रक्चरल ऑडिट नाही. धक्कादायक माहिती समोर. पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी घेतला आढावा. येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश.
-
Maharashtra News : उद्या नरेंद्र मोदी-राज ठाकरेंची एकत्र सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या मुंबईत सभा. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची महायुतीसाठी जाहीर सभा. शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या दोन्ही नेत्यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा.
-
Maharashtra News : केज तालुक्यातील नांदूर दगडफेक प्रकरण
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर येथे दगडफेक झाली होती. गावात तणावपूर्ण शांतता आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल केलेल्या पोस्टमुळे तणाव. पोलिसांच्या दोन तुकड्या गावात दाखल. दोन गटात झाली होती दगडफेक. दगडफेकीत तीन जण किरकोळ जखमी.
Published On - May 16,2024 8:30 AM