इराणमध्ये काही तरी मोठं घडतंय? खामेनेईनं पुन्हा वाढवला इस्रायलाचा बीपी, अमेरिका फुल्ल टेन्शनमध्ये
अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. यामध्ये इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या महत्त्वाच्या अणू केंद्रांचा समावेश होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा इराणनं मोठा निर्णय घेतला आहे.

21 आणि 22 जूनच्या मध्यरात्री अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. यामध्ये इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या महत्त्वाच्या अणू केंद्रांचा समावेश होता. ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ मिशन अंतर्गत अमेरिकेनं इराणवर हे हल्ले केले. इराणमधील सर्व गुप्त अणू केंद्र नष्ट करणं हा त्यामागे अमेरिकेचा उद्देश होता. मात्र इस्रायलसोबत झालेल्या युद्धानंतर आणि अमेरिकेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर देखील इराण मागे हटण्यास तयार नाहीये.
नुकतेच Maxar Technologies कडून नवे सॅटेलाईट छायाचित्र जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दिसून येत आहे की पुन्हा एकदा इराणने त्यांच्या अणू केंद्रावर काम सुरू केलं आहे. या छायाचित्रमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, इराणने पुन्हा एकदा त्याच्यो फोर्डो अणू केंद्रावर खोदकमाला सुरुवात केली आहे. इराणचं फोर्डो अणू केंद्र असलेल्या भागामध्ये अनेक बुलडोझर, ट्रक आणि इतर मोठी खोद काम करणारी भुयार बनवणारी मशिन दिसू आली आहेत.
पुन्हा एकदा अणू केंद्रांची उभारणी?
तज्ज्ञांच्या मते इराणने अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यापूर्वीच त्यांचं फोर्डो अणू तळ पूर्णपणे रिकामं केलं होतं.संवेदनशील साधन सामग्रीला त्यांनी दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवलं होतं. त्यांनी काही भुयारांमध्ये मुद्दामहून मातीचा भराव टाकला होता, ज्यामुळे समजा हल्ला झालाच तर अणू केंद्र सुरक्षित राहावं. आता समोर आलेल्या सॅटेलाईट छायाचित्रामध्ये पुन्हा एकदा या परिसरात खोदकाम सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इराणने पुन्हा एकदा अणू केंद्रांच्या उभारणीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेची प्रतिक्रिया
याबाबत बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे की, फोर्डोवर 60 टक्के समृद्ध युरेनियमचा साठा होता, मात्र जेव्हा आम्ही हल्ला केला तेव्हा तो साठा तिथेच होता की नाही? याबाबत शंका आहे. मात्र आमचा हल्ला एवढा प्रभावी होता की, त्यामुळे आम्ही ज्या अणू केंद्रांवर हल्ला केला, त्या सर्व अणू केंद्रांची क्षणता पूर्णपणे नष्ट झालेली आहे.
