मोठी बातमी! अजितदादांचे भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप अन् महायुतीत भूकंप, रवींद्र चव्हाणांंचं सर्वात मोठं विधान
अजित पवार यांनी शुक्रवारी बोलताना मोठं विधान केलं, त्यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यानंतर आता भाजप चांगलंच आक्रमक झालं असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती झाली आहे, तर मुंबईसह अनेक महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट या युतीमध्ये सहभागी नाहीये. तसेच ज्या ठिकाणी अजित पवार गट महायुतीचा घटक आहे, तिथे अजित पवार गटाच्या वाट्याला अत्यंत कमी जागा आल्याचं चित्र आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती आहे. इथे राष्ट्रवादीचा थेट सामना भाजपसोबत होणार आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाला वेग आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण तो सिद्ध झाला का तर नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यासोबत मी सत्तेत आहे. भाजपने पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्या हा एक भ्रष्टाचारच आहे. त्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्या या विधानानंतर आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
अजित पवार यांना महायुतीत घेतल्याचा पश्चताप होतो का? असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात. प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळं कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान काही लोक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. काहींना तर स्क्रिप्ट लिहून देतात, कोणता शर्ट घालायचा, हे सगळं एजन्सी ठरवते. एजन्सी भाड्यानं घ्यायची आणि हे सर्व करायचं. पैसा बक्कळ आहे. एखाद्या कंपनीमध्ये शेकडो मुलं बसवायची आणि मी किती पॉप्युलर आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण आपण आपले पाय जमिनीवर ठेवायचे, असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी नाव न घेता अजित पवार यांना लगावला आहे.
