डोंबिवलीत शटर उचक्या टोळीची दहशत, मध्यरात्री मेडिकलच्या दुकानात शिरुन… पाहा CCTV व्हिडीओ

| Updated on: Oct 12, 2025 | 3:38 PM

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील छेडा मेडिकल स्टोअरवर शटर उचक्या टोळीने मध्यरात्री धाडसी चोरी केली. पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या दुकानातून ३५,५०० रुपयांचा ऐवज चोरला गेला. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर हा कायमच गर्दीने गजबजलेला पाहायला मिळतो. आता त्याच भागात शटर उचक्या टोळीची दहशत पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत मध्यरात्री एका शटर उचक्या टोळीने धाडसी चोरी करत पोलिसांना थेट आव्हान दिलं आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील छेडा मेडिकल नावाच्या दुकानाला चोरट्यांनी निशाणा बनवलं. विशेष म्हणजे, चोरी झालेलं हे दुकान पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवलीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी छेडा मेडिकल दुकानाचं शटर उचकटलं. यानंतर आत प्रवेश केला. यावेळी दुकानातील १३ हजार रुपये रोख रक्कम आणि ७ चांदीचे कॉईन असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या धाडसी चोरीमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचं स्पष्ट झालं आहे. ही संपूर्ण घटना दुकानाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे शटर उचकटताना आणि दुकानातून ऐवज घेऊन जाताना दिसत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यानंतर शटर उचक्या टोळीच्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासचक्रे फिरवली आहेत.

व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र स्टेशन परिसर आणि पोलिस ठाण्यापासून अगदी जवळच असलेल्या या अत्यंत गजबजलेल्या भागात चोरी झाल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या परिसरात चोरी होण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, त्याच ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. व्यापारी वर्गाने पोलिसांच्या धाकावर आणि शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांना या टोळीचा तातडीने छडा लावून त्यांना गजाआड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Published on: Oct 12, 2025 01:35 PM