असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो, असदुद्दीन ओवैसी यांची झोंबरी टीका
मोदींवर ट्रम्प बोलत आहेत, पण हे भाजपवाले काहीच बोलत नाहीत. डोनाल्ड ट्रम्पला भाजपवाले एवढे का घाबरत आहेत. ट्रम्प म्हणतो मोदी मला खुश करण्यासाठी प्रयत्न करतात. डोनाल्ड ट्रम्प याद राख आम्ही भारतीय लोक आहोत.आम्ही कोणाचाही गुलामी स्वीकारत नाही असेही असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

सोलापुरात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची प्रचारसभा झाली. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी राजीनामा दिला आहे. त्याचा उल्लेख करत ओवैसी यांनी सोलापुरातील पक्षात कोणी नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईन, मी फारूक शाब्दी यांचा राजीनामा स्विकारलेला नाही.जोपर्यंत मी त्याच्या कुटूंबातील लोकांशी बोलत नाही, तोपर्यंत मी राजीनामा स्विकारणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली.
आंदोलनवेळी माझ्यावर लाठीचार्ज झाला त्यावेळी माझे 4 बोटे तुटली, डोक्यात 18 टाके पडले आणि मणक्यात गॅप पडला. त्यावेळी त्यावेळी माझ्या वडिलांनी याबद्दल बंद पुकारला नाही.त्यामुळे मी असलो नसलो तरी तुम्ही एमआयएमला मतदान करणार की नाही असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थितांना केला.
एमआयएमला सोडचिट्टी देणाऱ्या फारूक शाब्दी यांचा उल्लेख करत ते म्हणाले की 790 वोट घेतलेला मला धमाकावतो काय, मी शुक्रवारची नमाज तुझ्या गल्लीत येऊन करतो असे आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी शाब्दी यांना केले. ते पुढे म्हणाले की तुझ्या घरातील लोकं एमआयएमला मतं टाकतील त्यामुळे मस्ती करु नको असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गुजरातमध्ये पेट्रोल 97 रुपये आणि सोलापुरात 104 रुपये आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची कोणासाठी सेटिंग सुरु आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर थोडे कमी करा. अजित पवार म्हणाले होते धरणात मुतू का? अजित पवार सोलापूरला आलेला निधी कुठे गेला? सोलापुरात मन्सूरी कुटुंबातील 10 लोकं जळून मेले. सोलापूरात 8 दिवसातून एकदा पाणी येते आणि मोदी म्हणतात ‘नल से जल, जल से नल’ अशी टीका ओवैसी यांनी यावेळी केली.
सोलापूरातील महिलांचे मी कौतुक करतो की त्या पहाटे 2 वाजता पाणी भरण्यासाठी उठतात. सोलापूर महापालिकेचे 1300 कोटी बजेट आहे, मग पैसे कुठे जातात असा सवाल ओवैसी यांनी यावेळी केला. अजित पवारना व्होट म्हणजे मोदीना व्होट त्यामुळे तुम्ही अजित पवारना मतं देणार का? त्या दोन नंबर धंदे करणाऱ्याला (तौफिक शेख) व्होट देणार का? असाही सवाल ओवैसी यांनी केला.
असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं तू मारल्यासारखे करायचे आणि मी रडल्यासारखे करतो असे सुरु आहे. मात्र मुंबईत हे तिघे एकत्र मिळून मलई खातात. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजपविरोधात बोलले आणि नंतर संध्याकाळी फोन आला की लगेच नरमले. माझे नाव असदुद्दीन ओवैसी आहे,असले 56 अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो असे आव्हान त्यांनी यावेळी अजित पवारांना दिले.
ते पुढे म्हणाले की संसदेत वक्फ बोर्ड कायदा होताना अजित पवारांनी त्याला पाठिंबा दिला होता. भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंग वाढले आहे. एका बीएसएफ जवानाच्या मुलाला पिंकी पिंकी म्हणून जीव मारले. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या त्यावर अजित पवार काही बोलले का? असेही यावेळी ओवैसी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प मोदींवर एवढे बोलतात, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ट्रम्प विरोधात बोलत नाहीत असेही ते म्हणाले.
