Gulabrao Patil : सोन्या, तू अजून शुद्धीवर आला नाही का? गुलाबराव पाटील कुणावर भडकले?
Gulabrao Patil Angry : मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा राज्यात रंगल्या आहेत. त्यापूर्वीच मोर्चाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते 5 जुलै रोजी एकत्र येणार आहे. त्यावर भाष्य करताना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अशी खोचक टीका केली.

किशोर पाटील/प्रतिनिधी/जळगाव: हिंदी विरोधी सूर आवळत दोन्ही ठाकरेंचे मनोमिलन होणार का? अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगली आहे. त्यावर सर्वच पक्षातून प्रतिक्रिया येत आहे. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्यावर भाष्य केले आहे. विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबत सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांच्या वक्तव्याने आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधाला धार चढल्याची चर्चा आहे.
मराठी आमची भाषा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चांगली गोष्ट आहे, या गोष्टीला कोणाचा विरोध थोडी आहे. मराठी ही आमची भाषा आहे ही आम्ही मान्य करतो. विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबत सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, असे मत त्यांनी मांडले.
सोन्या, तू अजून शुद्धीवर आला नाही का?
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काल संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या बंकरमध्ये लपून बसले अशी बोचरी टीका केली होती. त्या वक्तव्याचा आज पाटील यांनी समाचार घेतला. “एकनाथ शिंदे तुझ्या छाताड्यावर बसले आहेत सोन्या….तू अजून शुद्धीवर आला नाही का?” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. हिंदी सक्ती वरून एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरूनच मंत्री गुलाबराव पाटील उत्तर दिले आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र येतील का?
राज आणि उद्धव ठाकरे पुढील काळात एकत्र येतील का? या प्रश्नावर पाटील यांनी उत्तर दिले. शेवटी ज्याला त्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी देवाने दिली आहे. शेवटी कोणी काय निर्णय घ्यावा हा पक्षप्रमुखांचा विषय आहे आणि हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत. ते जे निर्णय घेतील ते घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महानगरपालिका जागावाटपात शिवसेना आणि भाजप मतभेद असल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजूनही वातावरण काही तापलेले नाही. कुठलीही बोलणी अजून झालेली नाही. कोणी एखादं जण बोललं म्हणजे सर्व काही तस होते असे काही नाही. जागा वाटपाबाबत राज्याची पॉलिसी आहे. यात जी पॉलिसी ठरेल ती आम्ही ठरवू. जागा वाटपाच्या विषयामध्ये या गोष्टी होत राहतात.
दोन्ही राष्ट्रवादीत आय लव्ह यू
गुलाबराव पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठे विधान केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी सूचक वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत. हे कोण अमान्य करतं. त्या दोघांमध्ये आय लव्ह यू आहे, असा चिमटा त्यांनी काढला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले असून यावर मंत्री गुलाबराव पाटील प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसेंना उत्तर दिले असते पण…
रोहिणी खडसे आमच्या जिल्ह्याच्या महिला आहेत नाहीतर त्यांना मी असे उत्तर दिले असता ना की त्यांना विचारच करावा लागला असता. ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात द्रोहीची जडफळात होत आहे अशी टीका राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे. त्यावर गुलाबराव पाटील प्रतिक्रिया दिली आहे.
