Maharashtra News LIVE : वांद्र्यातल्या गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा गोंधळ, पोलिसांवर दगडफेक
Maharashtra News LIVE : ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसाय विरोधात आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेकडून देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले. राज्यभरात मेडिकल आज बंद राहणार आहेत.

नीट परीक्षा पेपरफुटीबद्दल धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. राज्यातून या प्रकरणात काहींना अटकही करण्यात आली. पुण्यातील नामवंत कॉलेजच्या प्राध्यापिकेचा यात सहभाग असल्याने मोठी खळबळ उडाली. आरसीसी क्लासेसच्या संचालकांना अटक करण्यात आली. 3 मे 2026 रोजी देशभरात नीट परीक्षेचा पेपर असताना अनेकांकडून थेट 23 एप्रिल रोजीच हा पेपर आला होता. ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसाय विरोधात आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेकडून देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले. औषध विक्रेत्यांचा आज बंद असल्याने आणीबाणीत औषधांसाठी एफ डी एल कॉल करा अशा सूचना देण्यात आल्यात. आज सकाळपासूनच राज्यातील सर्व मेडिकल बंद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन गट अजित पवार यांच्या निधनानंतर पडलेत. पक्षातील काही नेते नाराज आहेत. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिवमध्ये खळबळजनक घटना, कोयत्याने वार करत पतीने पत्नीच शिर धडा वेगळे केलं
धाराशिवच्या कनगरा इथं खळबळजनक घटना
कोयत्याने वार करत पतीने पत्नीच शिर धडा वेगळे केलं
घटनेनं जिल्ह्यात खळबळ, कोयत्याने गळ्यावर, छातीवर , मानेवर वार
किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद, वादातून पत्नीला संपवलं
बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
आरोपी पती राजेंद्र ढोबळेला अटक
-
वांद्र्यातल्या गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा गोंधळ
वांद्र्यातल्या गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा गोंधळ
स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक
दगडफेकीनंतर पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज
पोलिसांच्या अंगावर बाटल्याही फेकण्यात आल्या
घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती
दगडफेक करणाऱ्या स्थानिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
-
-
कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये
कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये
नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या घेणार जाणून
उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पथक करणार चर्चा
शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये
-
येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून 1235 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले. यानंतर देखील नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दर कोसळले असून येवल्यात सकाळच्या सत्रात 250 वाहनातून आलेल्या कांद्याला जास्तीतजास्त 1000 रुपये तर कमीतकमी 200 रुपये भाव मिळाला आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे शेतकरी सांगत आहेत. -
वाढत्या उन्हामुळे दुग्धोत्पादनात घट; दूधाला हमीभावाची मागणी
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचल्याने गोवंशीय जनावरांच्या खाण्यापिण्यावर आणि रवंथ करण्यावर परिणाम झाला आहे. यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली होती. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी गोठ्यात पंखे, स्प्रिंकलर आणि पाईपद्वारे जनावरांना दिवसातून ३-४ वेळा अंघोळ घालण्याची व्यवस्था केली आहे . या उपायांमुळे गोठ्यातील तापमान कमी होऊन दूध उत्पादन पूर्वपदावर आले आहे.
-
-
अहिल्यानगरात जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी
अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्या बाहेर वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिला आहे. चारा टंचाईची चाहूल लागल्याने पुढील दोन महिन्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. -
गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांविरोधात अकोल्यात आंदोलन
अकोला : देशात वाढती महागाई आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांविरोधात आज अकोल्यात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून चरणबद्ध आंदोलन करण्यात आले. तर गॅस सिलिंडरचे दर तत्काळ कमी करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. -
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत- शिंदे
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकाही झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
-
नांदेड – मोटेगावकर यांच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात नांदेडमध्ये तीव्र संताप आंदोलन करण्यात आले. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेडमधील आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेस समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोटेगावकर यांच्या पोस्टरला काळ फासले आणि क्लासेस समोर लावलेले सर्व बॅनर फाडून टाकले.
-
ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा
कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या जीएसआर 220 (ई) अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला आहे. ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारक ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
-
बुलढाणा : ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांची मागणी
बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाई भासत असून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी डिझेल मिळत नसल्याने शेती मशागतीचे कामे रखडली आहेत . येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे. आताच शेती नांगरणी केली नाही तर शेती पेरायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांचा समोर उभा राहिला आहे . शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी डिझेल अपबल्ध करून द्यावे, या मागणीसाठी आज ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
-
‘डायल 112’ सेवा चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी,चार महिन्यात 10 हजार 931 कॉल
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली ‘डायल 112’ सेवा चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे. कॉल प्राप्त झाल्यानंतर सरासरी अवघ्या 9.9 मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. जानेवारी ते एप्रिल 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलाला तब्बल 10 हजार 931 कॉल प्राप्त झाले असून त्यावर तात्काळ प्रतिसाद देण्यात आला.
-
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा पडला आहे. पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता पाहायला मिळत आहे. मागणी आणि पुरवठ्यात मोठा फरक निर्माण झाला आहे. ८१ पेट्रोल पंपांवर पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.
-
हिंगोली विधान परिषदेची जागा आम्ही आमच्या पदरात पाडून घेऊ-आमदार संतोष बांगर
येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज हिंगोलीत शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत शिव सैनिकांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या यावेळी बोलताना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव म्हणाले हिंगोली/परभणी विधानपरिषदेची पारंपारिक जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे ही जागा आमचीच आहे. तर आमदार संतोष बांगर म्हणाले परभणी आणि हिंगोली विधान परिषदेची जागा आम्ही आमच्या पदरात पाडून घेऊ.
-
मेडिकल बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
केमिस्ट असोसिएशनचा आज राज्यव्यापीत बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 4 हजारहून अधिक मेडिकल बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सांगलीच्या सिविल हॉस्पिटल शेजारी अनेक मेडिकल आहेत. ते बंद अवस्थेत आहेत. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक गोर गरीब रुग्ण दाखल असतात. या रुग्णांना बाहेरून औषध आणावी लागतात. मात्र त्याची गैरसोय होत आहे. अनेक नातेवाईक चिठ्ठ्या घेऊन फिरत आहे.
-
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू
सोलापुरात एका जागेसाठी 616 मतदार असणार असून 1 जागेसाठी निवडणूक पार पडणार आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती. महापालिका 111, झेडपी 68, पंचायत समिती 11, नगरपरिषद, नगरपंचायत 426 असे एकूण 616 मतदार असणार आहेत
-
रिसोड शहरात पिसाळलेला कुत्रा 25 जणांना चावला
वाशिमच्या रिसोड शहरात पिसाळलेला कुत्रा 25 जणांना चावला . जखमींमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आलं आहे. पिसाळलेला कुत्रा चांदणी चौक, लोणी फाटा, रामनगर भागातील नागरिकांना चावला. सर्व जखमींना उपचारासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
विधानपरिषद निवडणुका महायुती एकत्रच लढणार – देवेंद्र फडणवीस
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या जागांबाबत एकत्र निर्णय घेणार. विधानपरिषद निवडणुका महायुती एकत्रच लढणार. 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी. राहुल गांधी रिजेक्टेड माल देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार .
-
पवार साहेबांनी योग्य सांगितलं – देवेंद्र फडणवीस
“देशात अणूऊर्जेची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती. पुन्हा या संपूर्ण न्यूक्लियर एनर्जीला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. पवारसाहेबांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. मोदी परदेशात का गेले? अशी टीका करत होते. त्यावेळी ज्या प्रकारचे विविध करार भारताने केलेत, त्यामुळे पुढेच भवितव्य सुरक्षित झालय. त्यामुळे पवार साहेबांनी योग्य सांगितलं” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.
-
CSR कॉनक्लेव्हमध्ये 150 कोटींचे करार – देवेंद्र फडणवीस
CSR भागीदारांनी दिलेला पैसा तळागाळापर्यंत पोहोचवला जाईल. देशात 36 हजार कोटी रुपये CSR माध्यमातून खर्च. आयटी विभागाने नवीन प्रकाराची सुरुवात केली आहे. CSR कॉनक्लेव्हमध्ये 150 कोटींचे करार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण
सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले. सोन्याचे दर जी एस टी सह 1 लाख 61 हजार 195 रुपये. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपये. सोन्या चांदीचे दर पुन्हा जैसे थे आल्याचे पाहायला मिळालं.
-
ठाणे रेल्वे स्थानकावरील असुविधेच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची आगपाखड
ठाणे रेल्वे स्थानकावरील असुविधेच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आक्रमक झाले आहेत. शौचालयाचं काम का झालं नाही? कानाखाली देईन एक.. असं म्हणत त्यांनी ठेकेदाराला धारेवर धरलं. सोबत डीआरएम हिरेन मीना तसंच इतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरदेखील त्यांनी आरडाओरड केली. तुम्ही काम करत नाही आणि जनतेच्या शिव्या आम्हाला खाव्या लागतात, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.
ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरील शौचालयाचं काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे. ते कधी होईल असं विचारलं असता अजून दोन महिने लागतील, असं ठेकेदार म्हणाला. त्यावरून नरेश म्हस्के भडकले.
-
पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे- छगन भुजबळ
“पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे. इंधन तुटवडा काही शहरांपुरता नाही तर जागतिक प्रश्न आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाची दरवाढ झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे. जिथे जिथे पाइपलाइनने गॅसची सुविधा असेल, तिथे आवर्जून अर्ज करा,” असं छगन भुजबळ म्हणाले.
-
शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देणार- सूत्र
शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाचाळवीर मंत्र्यांना शिवसेनेत डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्ट कार्ड चांगलं नसणाऱ्यांना मित्रमंडळातून डच्चू देणार असल्याचं कळतंय.
-
पुण्यात रोहित पवारांसह बारामतीतील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक
जनाई-शिरसाई, सीना, कुकडी, पुरंदर योजनांच्या पाणी प्रश्नावर प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्याबाबत आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसह सिंचन भवनमध्ये दाखल झाले आहेत. रोहित पवारांसह बारामतीतील शेतकरीसुद्धा पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. मुख्य अभियंतासोबत आमदार रोहित पवार यांच्यासह सिंचन भवन इथं सुरू असलेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. कालव्याच्या माध्यमातून पाणी वाटपामध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. राजकीय दबावापोटी बारामती आणि इंदापूरला पाणी दिलं जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मुख्य अभियंत्याला लेखी आश्वासन मागत आहेत. त्याशिवाय सिंचन भवन मधून हलणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
-
जालना शहरात पेट्रोल पंपावर लागले ‘नो स्टॉक’चे फलक; वाहनधारकांची मोठी गैरसोय
जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नसल्याने हे पंप पूर्णतः बंद झाल्याच्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्डदेखील लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जालना ते छत्रपती संभाजीनगर या मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवर इंधनसाठा उपलब्ध नसल्याने त्यांनादेखील बॅरिकेट्स लावून नो स्टॉकचा फलक लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वाहन धारकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना या अडचणीचा सामना करावा लागतोय.
-
छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्याच्या विरुद्ध प्रश्नावर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलक कलेक्टर ऑफिसच्या गेटवर दाखल झालेत. पोलिसांनी गेटवर आंदोलकांना रोखल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
पुणे – मोतीबिंदू ऑपरेशनदरम्यान 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, नातेवाईकांचे गंभीर आरोप
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
“ माझी मुलगी घरातून हसत-खेळत गेली होती, कोणताही आजार तिला नव्हता, फक्त डोळ्यांचं ऑपरेशन होतं… असा प्रकार दुसऱ्या कुणाच्या मुलीसोबत घडू नये,” अशी भावनिक प्रतिक्रिया वडिलांनी दिली.
-
जालना – आज मेडिकल स्टोअर चालकांचा एक दिवसाचा संप, 2000 पेक्षा अधिक चालकांचा पाठिंबा
ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात आज मेडिकल स्टोअर चालकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील जवळपास 2000 पेक्षा अधिक मेडिकल स्टोअर चालक संपामध्ये सहभागी झालेत. एक दिवसीय संपाला मेडिकल चालकांनी पाठिंबा देत दिवसभर मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला .
-
नाशिकमधील RCC मोटेगावकर क्लास अखेर बंद
नाशिकमधील RCC मोटेगावकर क्लास अखेर बंद. नाशिकच्या पोलीस आयुक्तालया शेजारील नव्या इमारतीत RCC मोटेगावकर क्लास सुरू करण्यात आला होता. – मात्र मोटेगावकरवर कारवाई झाल्यानंतर क्लास अचानक बंद करण्यात आला, क्लासवरील बोर्ड देखील काढून टाकण्यात आले.
-
जळगाव – नशिराबाद येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड
जळगावच्या नशिराबाद येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. अक्षरशः मोठमोठ्या टाक्या, ड्रम घेऊन पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नशिराबाद येथील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनधारक आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या.
अनेक शेतकरी कॅन, ड्रम आणि विविध साठवणुकीची साधने घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे होते. पुढच्या काळात इंधन मिळणार नाही” , दर वाढतील या भीतीपोटी अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात आला.
-
ठाण्यात गुरुवार २१ मे दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार २२ मे दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी नाही
बारवी जलवाहिनीवरील तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार दुपारपासून ठाणे,मुंब्रा,दिवा, कळवा परिसराचा पाणीपुरवठा तब्बल २४ तास बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतरही पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. आंध्रा आणि बारवी धरणातील पाणीसाठ्यातील तूट तसेच यंदा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाणी वापराचे नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. तसेच जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथील जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती आणि उन्नतीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार २१ मे दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार २२ मे दुपारी १२ वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
-
ऑनलाइन औषध विक्रीविरोधात देशभरातील मेडिकल स्टोअर्सचा आज बंद
AIOCD च्या हाकेला प्रतिसाद; ई-फार्मसी आणि इंस्टंट डिलिव्हरी ॲप्सविरोधात निषेध करण्यात आला आहे. कडक नियम लागू करा, पारंपरिक मेडिकल व्यवसाय वाचवा अशी संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार चौकातील पंधरा ते वीस मेडिकल बंद आहेत.
-
एक बांगलादेशी घुसखोर महिलेला शोधण्यात जळगाव, भुसावळ पोलिसांना यश
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेविरुद्ध यशस्वी कारवाई करण्यात आली असून तिच्याविरुद्ध गुन्हा क्र २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेचे मूळ भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश असे असल्याचे निष्पन्न झाले. संशयास्पद व्यक्ती अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले.
-
वांद्रे पूर्व गरीब नगर अतिक्रमण हटाव मोहिमचा आज दुसरा दिवस
वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतलीय. कालपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील दोन रेल्वे पूल आजही बंद ठेवण्यात आलेत. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर हजारो बेकायदेशीर झोपड्या उभ्या होत्या. उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर कालपासून रेल्वेने इथे 6 बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम सुरू केलंय. आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच आहे. कारवाईसाठी 1000 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्वेतील दोन महत्त्वाचे रेल्वे पूल आज दुसऱ्या दिवशीही बंद ठेवलेत.
-
जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर दुसऱ्या दिवशी देखील डिझेल साठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा
ग्रामीण भागात पंपांवर डिझेलचासाठा संपल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकरी जळगाव शहरातील पेट्रोल पंपकडे वळल्याने मोठी गर्दी झाली आहे. डिझेल भरण्यासाठी मोठमोठे कॅन घेऊन शेतकरी सकाळी सहा वाजून पासून रांगेत उभे असल्याचा पाहायला मिळत आहे… एकीकडे शेतकरी तसेच नागरिक रांगेत उभे आहेत तर दुसरीकडे चार चाकी वाहनांची भली मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे अवघ्या चार ते पाच तासातच डिझेलचा साठा संपत असल्याचा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे पुन्हा वाढ होईल या भीतीने पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. कॅनमध्ये शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना केवळ दोन हजार रुपयापर्यंतच डिझेल दिले जात असल्याचा देखील पहायला मिळत आहेत.
-
भोकरदन तालुक्यात इंधनासाठी हाहाकार! पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या दीड किलोमीटर लांब रांगा; शेतकरी अडचणीत
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी पंपावर वाहनांच्या तब्बल १ ते दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू असल्याने ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी डिझेलची मोठी आवश्यकता आहे. मात्र, इंधन टंचाईमुळे शेतकरी बांधव हातात कॅन घेऊन तासन्तास पंपावर ताटकळत उभे आहेत. पंपावर इंधनाचा टँकर दाखल होताच नागरिक आणि शेतकऱ्यांनी पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? मनोज जरांगे पाटलांचे प्रसाद लाड यांना अंतरवाली सराटीत येण्याचे निमंत्रण
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना चर्चेसाठी अंतरवाली सराटी येथे येण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेतून १०० टक्के मार्ग काढतील आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास प्रसाद लाड यांनी मीडियासमोर व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी राज्यातील आपल्या नियोजित बैठका थांबवल्या असून, लाड यांनी २३ मे पूर्वी अंतरवालीत येऊन मागण्यांच्या अंमलबजावणीवर ठोस चर्चा करावी, असे म्हटले आहे. तसेच, या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आता शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला कोणताही दगाफटका करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
-
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात सोलापूरसह देशभरात केमिस्टचा संप
बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवास्तव सवलतींच्या (Predatory Pricing) निषेधार्थ आज सोलापूरसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. केंद्र सरकारने कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीबाबत काढलेल्या नोटिफिकेशनचे अद्याप कायद्यात रूपांतर झाले नसून, दिल्ली उच्च न्यायालयानेही या ऑनलाईन विक्रीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरकारने हा जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) संघटनेने केली आहे. दरम्यान, या संपामुळे नागरिकांची कोंडी होऊ नये म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काही ठराविक मेडिकल दुकाने आणि रुग्णालयांमधील आयसीयू (ICU) मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
-
सोलापुरात औषध विक्रेत्यांचा एल्गार, ऑनलाईन औषध विक्रीविरोधात भव्य मोर्चा
बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आज सोलापूरसह देशभरात औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. या देशव्यापी बंद आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील ‘चार हुतात्मा स्मारका’पासून औषध विक्रेत्यांच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीचे नोटिफिकेशन रद्द करावे, या मागणीसाठी केमिस्ट असोसिएशन रस्त्यावर उतरली असून, या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील औषध बाजारपेठ कडकडीत बंद आहे.
-
पुणेकरांची प्रतीक्षा लांबली, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची १५ जूनची डेडलाईन हुकणार
पुण्यातील आयटी व्यावसायिक आणि चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो-३ (Pink Line) प्रकल्पाची १५ जूनची डेडलाईन हुकण्याची चिन्हे आहेत. या मार्गिकेवरील अनेक स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने ठरलेल्या वेळेत ही मेट्रो धावणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष स्थानकांवरील अंतर्गत कामे आणि तांत्रिक पूर्तता बाकी आहे. काही अहवाल आणि सद्यस्थितीनुसार, हा संपूर्ण प्रकल्प आता थेट २०२६ च्या अखेरपर्यंत म्हणजेच वर्षाच्या शेवटी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
-
पुण्यात उन्हाचा कडाका वाढला, उकाड्याने पुणेकर हैराण
पुणे शहरासह उपनगरांमध्ये उन्हाचा चटका कमालीचा वाढला असून, सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मगरपट्टा परिसरात आज सर्वाधिक ४१.१ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर शहराच्या इतर भागांतही पारा ३९ ते ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्यामुळे पुणेकर नागरिक कमालीचे हैराण झाले असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
-
अमरावतीत २,७०० मेडिकल दुकाने बंद; ऑनलाईन औषध विक्रीला तीव्र विरोध
अमरावती जिल्ह्यात ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आणि कोरोना काळातील होम डिलिव्हरीचे नोटिफिकेशन रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मेडिकल असोसिएशनने आक्रमक पाऊल उचलले आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील तब्बल २ हजार ७०० मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. या संपामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अति अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा मेडिकल असोसिएशनने ८८ सदस्यांचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून रुग्णांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
-
कारागृहात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड याची बीड कारागृहात प्रकृती खालावली आहे. त्याला लघवीच्या जागी (मूत्राशय) त्रास होत असल्याने उपचार. त्याला ‘युरोसिसटायटीस’ (मूत्राशयाचा संसर्ग) आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारागृहातच सलाईन लावून त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असून, पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
-
मुंबईत उष्णता आणि दमट वातावरणाचा नागरिकांना त्रास
मुंबईत उष्णता आणि दमट वातावरणाचा नागरिकांना आजही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाण्याची शक्यता असून, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे “हॉट अँड ह्युमिड” वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागेल.सकाळपासूनच मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात उकाडा जाणवत असून दुपारच्या वेळेत उष्म्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
जिल्ह्यातील उमरेड-भिवापूर मार्गावर मालवाहू ट्रकला भीषण आग
आज पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान उमरेड-भिवापूर मार्गावर एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ट्रकमध्ये विविध प्रकारचा माल भरलेला होता. आग लागल्याची माहिती मिळताच उमरेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, उमरेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रण करत परिस्थिती हाताळली.
-
पुणे विभागातील धरणांमध्ये 25 टक्के जलसाठा शिल्लक
राज्यात 3 हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ सुमारे 33 टक्के पाणीसाठा शिल्लक. सर्वाधिक पाणीसाठा अमरावती विभागात ४४.३९ टक्के साठा असून, सर्वांत कमी साठा पुणे विभागात केवळ २५.२६ टक्के साठा उरला आहे. पावसाळा सुरू होऊन धरणात पुरेसा साठा होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या काटकसरीसाठी ‘जलसंपदा’चे आवाहन
-
नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर
नीट पेपरफुटी प्रकरणात आता नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावे समोर आल्याची चर्चा. संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयकडून नोटिसा जारी. चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली. शुभम खैरनार आणि क्लास चालकांमधील थेट संबंधांचा तपास सुरू. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरे पुरवली गेली का, याचाही शोध. मोठ्या रकमांचे व्यवहार, बँक खाते आणि दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी. सीबीआयकडून कोणत्याही क्षणी क्लासेस आणि संस्थांवर छापेमारीची शक्यता
-
हिंगोली सलग पाचव्या दिवशीही डीझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपा बाहेर रांगा
हिंगोली-सलग पाचव्या दिवशीं ही डीझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपा बाहेर रांगा. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डीझेल उपलब्ध नसल्याचे फलक. खरीप पेरणीच्या तोंडावर डीझेल उपलब्ध होत नसल्याने अंतर मशागतीच्या कामात व्यथ..
-
राज्यभरात मेडिकल राहणार आज बंद
ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसाय विरोधात आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेकडून देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळपासूनच मेडिकल बंद असल्याचे बघायला मिळतंय.
Published On - May 20,2026 8:12 AM
