Explained : संतोष धुरी तर गेले पण आता मनसेने त्यांच्यामागे निदान असं बोलू नये
Santosh Dhuri : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अत्यंत विश्वासू शिलेदार संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंबईत मनसेसाठी हा मोठा झटका आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला आहे. 16 जानेवारीला मतमोजणी आहे.

सध्याच्या राजकारणात इनकमिंग-आऊटगोईंग एकदम सर्रास झालं आहे. पक्षनिष्ठा, विचार हे सगळं बाजूला पडलं आहे. 2019 नंतर महाराष्ट्राच राजकारण इतकं झपाट्याने बदललं की, अनेकांनी वर्षानुवर्षाची निष्ठा एका क्षणात बदलली. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे पक्षांतराला बहर आला आहे. मागच्याच आठवड्यातलं दिनकर पाटील यांचं उदहारण खूप बोलकं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली म्हणून दिनकर पाटील हे बँजोच्या तालावर नाचत होते, पेढे भरवत होते. नाशिक महानगर पालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा त्यांनी घेतल्या होत्या. ठाकरे बंधुंची युती झाली म्हणून आदल्यादिवशी नाचणारे दिनकर पाटील यांनी अचानक दुसऱ्याचं दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. 20-25 वर्षांपूर्वीच महाराष्ट्राच राजकारण बघितलं, तर अशा घटना दुर्मिळ होत्या. त्यावेळी पक्षनिष्ठा, विचारधारा यांना एक महत्व होतं. पण आज तुम्हाला सर्वच पक्षात असे दिनकर पाटील भेटतील.
महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षांपासून भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडे प्रवेशाचा ओघ जास्त असणं स्वाभाविक आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने घवघवीत यश संपादन केलं. त्यामुळे महापालिकेच्या वेळी महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेशाचा ओघ वाढणं स्वाभाविक होतं. पण असे हे झुंडीने पक्ष प्रवेश होत असताना काही नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी विचार करायला भाग पाडते. अशा नेत्यांपैकीच एक आहेत संतोष धुरी. आज संतोष धुरी हे नाव काढलं की, पटकन डोळ्यासमोर येतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष.
संघर्ष करणारे फार थोडे
आज हेच संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी सारख्या नेत्याने पक्ष सोडणं हा पत्रकारीतेच्या भाषेत मनसेसाठी धक्का, झटका आहे. पण त्याहीपेक्षा मनसे आणि राज ठाकरे यांचं भविष्यात मोठं नुकसान आहे. कारण संतोष धुरींसारखी निष्ठावान माणसं आजच्या राजकारणात दुर्मिळ झाली आहेत. अशी माणस सहसा भेटत नाहीत. आजच्या राजकारणात पैशाला महत्व आहे. अशावेळी निष्ठा टिकवून, खस्ता खात पक्षासाठी संघर्ष करणारे फार थोडे असतात. संतोष धुरी अशा नेत्यांपैकीच एक होते.
संतोष धुरींना गद्दार म्हणण्याआधी दहावेळा विचार करा
मनसेसाठी या माणसाने रस्त्यावरची लढाई लढली. मराठीच्या मुद्यावर आंदोलन असो किंवा एखाद्या स्थानिक प्रश्नासाठी अधिकाऱ्याला जाब विचारणं. संतोष धुरी नेहमीच आघाडीवर दिसायचे. मनसेसाठी त्यांनी अनेकदा हसत-हसत जेलवारी सुद्धा केली. त्यामुळे अशा नेत्याने पक्ष सोडून जाणं हे खूप मोठं नुकसान असतं. संतोष धुरींसारखा नेता सहज मिळणं हा भाजपचा असाही फायदाच आहे. उद्या भाजपने त्यांना आपल्या मुशीत घडवलं, तर पर्यायाने मनसेचं नुकसान आहे. संतोष धुरी निष्ठावान नाहीत किंवा त्यांना गद्दार ठरवण्याआधी दहावेळा विचार करा. मनसे हा पक्ष मूळ शिवसेनेतूनच तयार झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मानसिकतेत फार फरक नाही. ‘राहिले ते मावळे उडाले ते कावळे’, ‘गद्दार’, मिंधे अशी पक्ष सोडून गेलेल्यांना नाव तिथे दिली जातात. निदान संतोष धुरी यांच्या बाबतीत मनसेने अशी चूक करु नये.
