मनसेला रामराम करणार का? संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझी कदर…
मनसेचे ज्येष्ठ नेते संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून पक्षात माझी कदर झाली नाही अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सध्या सर्वत्र प्रचारसभा, राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी सत्ताधारी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाली आहे. त्यातच मुंबईतील मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे संतोष धुरी हे मनसेला रामराम करण्याची शक्यता आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल स्वत: संतोष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी कदर करण्यात आली नाही, असे खळबळजनक विधान करत त्यांनी आपली नाराजी उघड केली.
संतोष धुरी यांनी मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. मी अजिबात नाराज नाही. दुपारनंतर माझा राजकीय निर्णय सांगेन. मला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. मी गेल्या दोन दिवसांत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन, असे संतोष धुरी म्हणाले.
मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझ्यासोबत नितेश राणे होते. मला तिथे जाऊन बरं वाटलं. मला त्यांनी तात्काळ भेट दिली. त्यामुळे मला बरं वाटलं. त्यांनी माझी कदर केली. मला बंगल्यावर बोलवून घेतलं. नितेश राणे यांनी परवा मला संपर्क केला. ते सिंधुदुर्गावरुन माझ्यासाठी मुंबईत आले. ते रात्री आले. परत सकाळी निघून गेले. त्यांना माझ्यात काहीतरी वाटलं असेल. माझ्याबद्दल चांगलं वाटलं असेल. त्या कारणास्तव तिथे आले, मला भेटले आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया असे म्हटले. त्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास आम्ही चर्चा केली. मला बरं वाटलं. माझी राजकीय भूमिका ही मी दुपारनंतर स्पष्ट करेन. तिकीट वैगरे हा विषय नाही. मी माझी राजकीय भूमिका दुपारनंतर नक्की कळवेन. मला थोडा वेळ द्या, असेही संतोष धुरी यांनी म्हटले.
मी माझा निर्णय घेताना कोणाशीही चर्चा केलेली नाही
मनसेतील कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी राज ठाकरे यांच्याशीही कोणती चर्चा केलेली नाही. मी दोन दिवसांत हा निर्णय घेतला आहे. आज मी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलो तेव्हा संदीप देशपांडे मला मित्रासारखे नेहमीप्रमाणे भेटले. यापुढे संदीप देशपांडे यांनी मैत्री ठेवली तर आमची मैत्री राहील. मी माझा निर्णय घेताना कोणाशीही चर्चा केलेली नाही, असेही संतोष धुरी यांनी सांगितले.
दरम्यान संतोष धुरी हे मनसेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतल्याने हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. आज दुपारी संतोष धुरी आपली अधिकृत घोषणा करतील, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
