जंगली रमी पे आओ ना महाराज… शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव; रोहित पवारांच्या आरोपांनी एकच खळबळ, ते ट्विट काय?
Rohit Pawar : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी डाव खेळत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.

Manikrao Kokate Playing Rummy : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मोठा बॉम्ब गोळा टाकला. पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवरच रमीचा डाव मांडल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला असताना कृषी मंत्र्यांच्या या बेजबाबदार वर्तनाने विरोधकच नाही तर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यावर विविध नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
“कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज”
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर त्यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
काय आहे ते ट्विट
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
विरोधकांकडून तीव्र संताप
अजितदादा समज देतील
याप्रकरणी अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. स्क्रोल करताना कृषीमंत्र्यांसमोर हा खेळ आला असेल. विरुंगुळा म्हणून ते त्यांना दिसले असेल. पण त्याला मुद्दाम चुकीचे वळण देऊ नये असे ते म्हणाले. जे झाले ते चुकीचे आहे. त्यांनी सभागृहाचा दर्जा राखावा असे माझे मत आहे. अजितदादा नक्कीच त्यांना समज देतील, असे चव्हाण म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका
या व्हिडिओवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांविषयी उलटसूलट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्यावर त्यांनी टीका केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी टोचले कान
आमदार, मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात. आपले वर्तनाने चुकीचा संदेश जाऊ नये. याविषयीची एथिकल कमिटी-नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल. कारण हा प्रकार सभागृहात झाला आहे. हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण राज्यात आमदारांच्या चुकीच्या वर्तवणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल. सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
असे मंत्री चालतातच कसे?
या कृषीमंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. अनुदानाचा पैसा शेतकरी लग्न कार्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला, अजून काय काय मुक्ताफळं उधळली. आणि हाच माणूस आता विधानसभेच्या सभागृहात रमी खेळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असा माणूस चालतोच कसा? असा सवाल करत याविरोधात आवाज उठवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले.
