Sanjay Raut: त्यांना मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाय…महापौराचा मुद्दा निघताच भाजपवर का भडकले संजय राऊत?
Sanjay Raut on BMC Hindi Mayor: मुंबईत हिंदी भाषिक उत्तर भारतीय महापौर होईल असे वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केले. त्यांनी एकप्रकारे उद्धव सेना आणि मनसेला डिवचले. त्यावर आता खासदार संजय राऊत यांची जळजळीत प्रतिक्रिया आली आहे.

Sanjay Raut on BMC Hindi Mayor: हिंदी भाषिक उत्तर भारतीय हा यंदा मुंबईचा महापौर होईल अशी वल्गना कृपाशंकर सिंह यांनी केली होती. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी या मुद्दावरून भाजपला चांगलेच घेरले. भाजपवर त्यांनी शाब्दिक वार केले. त्यामुळे येत्या 15 दिवसात मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये हा मुद्दा चांगलाच तापणार हे आता स्पष्ट होत आहे. काय म्हणाले संजय राऊत?
राहुल नार्वेकरांवर राऊतांची टीका
कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. त्यावर संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया दिली. हे आरोप नाही तर सत्य आहे. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासाठी नियम, संकेत आहेत की त्यांनी अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं. मी ते पाहिलं की, कमळाबाईचं उपरणं टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते गेले. त्याठिकाणी त्यांनी विरोधकांना धमकावले. या राज्यात काय चाललंय याची विचारण्याचीच सोय उरली नाही, असा टोला त्यांनी लगावला. तर नार्वेकर यांच्यावर टीका केली.
मनसे-उद्धव ठाकरे शिवसेनेचा उद्या संयुक्त जाहीरनामा
मनसे ठाकरेंचा संयुक्त जाहीरनामा उद्या जाहीर होईल.संयुक्त सभाही सगळीकडे होणार आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननामा संदर्भात काम करतायत.मीरा भाईंदर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर मुंबईत अश्या संयुक्त सभा होतील. नवीन दमाचे नेते त्यासाठी मेहनत घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.
भाजपचा अमराठी महापौर करण्याचा अजेंडा
भाजपने अमराठी महापौर बनवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे.कृपाशंकर सिंगवर त्याची जबाबदारी भाजपने दिलेली आहे.मुंबईत मराठी माणसाचे डोक फोडायचा भाजपचा डाव आहे. कृपाशंकर सिंग हा भाजपचा बोलका पोपट आहे. त्यांनी केलेलं विधान हे अनावधानाने नाही तर जाणूनबुजून केलेलं आहे. भाजप हा चाचपणी करत आहे. तो प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.त्यांना राज्यातही अमराठी महापौर करायचे आहेत. आता योगी आदित्यनाथ, सम्राट चौधरी असे अनेक नेते सक्रिय होतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्राच्या लढ्यात आणि कुठल्याच बाबतीत भाजपचा काहीही सबंध नसलेला पक्ष सत्तेत आहे. बाकी असंख्य नेते या लढ्यात होते भाजपचे लोक कुठेच न्हवते. पान खाऊन मराठी माणसांच्या तोंडावर पिचकारी मारण्यासाठी कृपाशंकर सिंगला काम दिलेल आहे. परप्रांतीयांची मत घेण्यासाठी केलेलं हे कारस्थान आहे. भाजपनेही मुस्लिम उमेदवार काही ठिकाणी दिलेले आहेत राणे पुत्रांना सांगा आता काय करणार आहात, असा चिमटा ही राऊतांनी काढला.
एबी फॉर्मबरोबर भाजप ५ कोटी देत आहे आणि शिंदे १० कोटी देत आहेत.आमच्या पक्षातल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत पण तमाशे केलेले नाहीत.काही जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
