Santosh Dhuri : युतीच्या चर्चेमध्ये ठरलेलं काय आणि उद्धवनी राज ठाकरेंना दिलं काय? संतोष धुरींचा मोठा गौप्यस्फोट
Santosh Dhuri : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला आज मोठा धक्का बसला. संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मनसे यंदाच्या निवडणुकीत 53 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उद्धव ठाकरेंकडे 164 जागा आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधली अंतर्गत खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्या युतीमध्ये नुकसान होत असल्याने मनसेच्या एका मोठ्या नेत्याने आज पक्ष सोडला. संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांनी दोन्ही पक्षांची युती होत असताना ज्या चर्चा झाल्या, त्या बद्दल मोठा गौप्यस्फोट केला. “आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे. आम्हाला ज्या सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे. पण त्यातील 7 ते 8 जागा येतील की नाही ही शंका आहे. आम्हाला ज्या सीट हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. आता ज्या सीट दिल्या आहेत, तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, नगरसेवक होते, पण त्यांची नावे खराब होती, अशा सीटही त्यांनी आम्हाला दिल्या” असं संतोष धुरी म्हणाले.
मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना युतीची बोलणी सुरु असताना ते प्रत्येक विधानसभेत दोन जागा सोडणार असं ठरलेलं. पण प्रत्यक्षात एका जागेवर बोळवण केली असा गौप्यस्फोट संतोष धुरी यांनी केला. “माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप जिथे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, तिकडे आम्ही दोन सीट मागितल्या होत्या. पण त्यांनी आम्हाला एक सीटवर बोळवण केली. त्यांना ज्या हव्यात त्या सीट त्यांनी दिल्या आहेत. 194 वॉर्डचा विषयच नव्हता” असं संतोष धुरी म्हणाले.
साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं
“मी माझ्या नेत्यांना विचारलं चर्चेत घोडं कुठे अडलं आहे? ते 192 आणि 190 बोलले. मला कळलं नाही. प्रत्येक विधानसभेमध्ये ते दोन सीट देणार होते. ते म्हणाले 194 मिळतेय पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे. पण ते सुद्धा झालं नाही. काय करायचय ते करा पण मला मोकळं करा असं मी सरदेसाई साहेबांना सांगितलं. 192 मिळाला, पण तिथे जे दोनवेळा नगरसेवक होते, त्यांच्याकडून तो वॉर्ड काढून घेतला. त्यांच्यावर अन्याय झाला. मी नेता नाही, त्यामुळे या चर्चेत नव्हतो. साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं” असं संतोष धुरी म्हणाले.
साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले
“संदीप देशपांडे यांना कुठल्याही चर्चेत सहभागी करुन घेतलं नाही. विचारण्यात आलं नाही. साहेबांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोन किल्ले सरेंडर केले. बांद्रयातून सांगण्यात आलेलं की, हे दोघेजण कुठेही दिसले नाही पाहिजेत. त्यामुळे चर्चेत घेतलं नाही” असं संतोष धुरी म्हणाले.
