Sanjay Raut: अजितदादा महायुतीमधून बाहेरच पडणार नव्हते, तर… संजय राऊत यांचा मोठा राजकीय बॉम्ब, विमान अपघातापूर्वी घडलं काय?
Sanjay Raut on Ajit Pawar And BJP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वाक्याने या चर्चांवर पडदाही पडला. पण त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्या निर्णयाविषयी मोठा दावा केला आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar And BJP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा रंगल्या आणि त्यावर नेहमीप्रमाणे पडदाही पडला. पण यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. विमान अपघातापूर्वी अजितदादा हे मोठा निर्णय घेणार होते. त्यापूर्वीच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. या विमान अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार का गप्प आहेत, असा टोकाचा सवालही त्यांनी विचारला.
मग तिसरी घंटा वाजवता कशाला?
विलिनीकरणाच्या चर्चेत अनेक नेते सामील होते. जयंतराव असतील. शरद पवार असतील. पण त्यानंतर हा विषयच संपला. आता राहिलेलंच नाही काही. शिवसेना अथवा राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह गिळतील. अमित शाहांनी ते गिळलेले आहे हे फडणवीसांनाही कळलेले नाही. वारंवार निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं. म्हणजे यांचं स्वतःच्या पक्षावर नियंत्रण नाही. सुप्रियाताई सुळे यांनी जे सांगितले ते सत्य आहे. विलिनीकरणावर पडदा पडला आहे. तरीही दुसऱ्या बाजूने पडदा कशाला हलवता आहे, दुसरी, तिसरी घंटा कशाला वाजवत आहात? विलिनीकरणाचे नाट्य संपलेले आहे आणि खेळ सुरू आहे, असे मी मानतो, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
अजित पवार यांचा भाजपसोबत भ्रमनिरास
दिवंगत अजित पवार यांचा भाजपसोबत जाऊन भ्रमनिरास झाला होता. अजित पवार हे ईडीच्या अथवा तपास यंत्रणांच्या भीतीपोटी नाईलाजाने महायुतीसोबत गेले. त्यात हसन मुश्रीफ असतील आणि अन्य काही नेते होते. आता ते हसन मुश्रीफ छातीपुढे काढून वाघासारखे चालत आहेत, पण त्यांचे काळीज उंदराचं आहे. त्यावेळी या लोकांची पळापळ झाली. इतके सगळं करूनही अजित पवार यांच्या फाईल्स या लोकांनी बंद केल्या नाहीत. जरांडेश्वर साखर कारखाना असेल, त्यांच्या नातेवाईकांवर तपास यंत्रणेच्या धाडी पडल्या. त्यावेळी ते अस्वस्थ होते. त्यावेळी त्यांनी ठरवले होते की इथं थांबून उपयोग नाही. आणि इथं राहून आपल्याला स्वाभिमानानं राहता येणार नाही. हा स्वाभिमानाने जगणाऱ्यांचा हा पक्ष नाही हे त्यांना कळून चुकलं होतं, असे संजय राऊत म्हणाले.
दादा भाजपविरोधात संघर्षाच्या तयारीत
काल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अजितदादा हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री होणार होते असा दावा केला होता. त्याविधानाशी खासदार संजय राऊत यांनी असहमती दर्शवली. फारतर अजितदादा उत्तम विरोधी पक्ष नेते झाले असते असे ते म्हणाले. त्यांची मानसिकता ही महायुतीतून बाहेर पडण्याची होती. तर अजितदादा म्हणाले होते की, माझ्याकडेही यांच्या फाईल्स आहेत, ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. त्यानंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्यावर कोणी काही का बोलत नाही? माझ्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या, नेत्याच्या फाईल्स आहेत, असे जेव्हा ते ठासून बोलले, याचा अर्थ त्यांची मानसिकता बाहेर पडण्याची होती. केवळ बाहेर पडण्याचीच नाही तर भाजपसोबत संघर्ष करण्याची होती, असा मोठा दावा राऊतांनी केला.
दादांच्या अपघातावर गप्प का?
त्यानंतर काही काळामध्ये अजित पवार यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. यावर खरंतर पार्थ पवार, अजित पवार यांनी सातत्याने आवाज उठवायला हवा. कसे काय गप्प बसतायेत हे सगळे? कुणाचा पती गेला आहे. तर कुणाचा बाप गेला आहे. आम्हाला चिंता वाटत आहे. आमच्या पुर्णेकरांची हत्या झाली म्हणून आम्ही लढत आहोत. आमचा एक कार्यकर्ता गेला म्हणून आमचा संघर्ष सुरू आहे. इतक्या मोठ्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यावर महाराष्ट्र आणि त्याच्या कुटुंबातील लोक शांत आहे, याचं मला आश्चर्य वाटत आहे, असे मोठे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
