Gulabrao Patil: …तर खरे सुखाचे दिवस येतील, गुलाबराव पाटील यांचा मोठा बॉम्बगोळा, महायुतीत मुख्यमंत्री पदाची पुन्हा चर्चा
Gulabrao Patil on Eknath Shinde- Devendra Fadnavis: महायुतीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा शिवसेनेच्या मंत्र्यांनी कधीच लपवून ठेवली नाही. भाजपकडूनही त्याला प्रतिवाद करण्यात आला आहे. आता सेनेचे मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील यांनी बॉम्बगोळा डागला आहे.

जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: महायुतीत मुख्यमंत्री पदावरून तीनही पक्षातील रस्सीखेच कमी झालेली नाही. 2024 नंतर अजूनही मित्रपक्षांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याचे वारंवार समोर येते. भाजप संख्याबळानं मोठा भाऊ असला तरी मित्रपक्षांना ही खुर्ची सातत खुणवते. त्यातून यापूर्वी टोकाच्या भूमिकाही समोर आल्या होत्या. देवाभाऊ आणि अनाथांच्या नाथामधील दुरावा समोर आला, तेव्हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ऐरणीवर येतोच येतो. आताही नंदुरबार येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून जोरदार बॅटिंग केली.
तर सुखाचे दिवस येतील
नंदुरबार येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी दणदणीत भाषण ठोकले. यावेळी उपस्थितांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, आपला नेता मोठा झाला पाहिजे अशी सुरूवात करत गुलाबराव पाटील यांनी मुळ मुद्याला हात घातला. त्यांची गाडी पुन्हा मुख्यमंत्री पदाकडे वळली. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा काढलाच. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर खरे सुखाचे दिवस येतील, असा दावा करून त्यांनी बिटवीन द लाईन्समध्ये बरंच काही सांगून टाकल्या. म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचंय आणि काय संदर्भ द्यायचंय हे शिवसैनिकांपर्यंत पोहचलंच.
उद्धव सेनेवर टीका
उबाठापासून तर सर्वच एकनाथ शिंदे यांची सुपारी घेत आहेत. पक्षाची जे लोक बदनामी करत आहेत, चिन्ह गोठवण्याच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे यांना संपवण्याचे प्रयत्न करत आहेत, त्याबाबत मी बोललो असे गुलाबराव पाटील म्हणाले. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि योग्य निर्णय दिला जाईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही पाटील म्हणाले.
नंदुरबारच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर डोळा
भविष्यात नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा असावा आणि तो मंचावर बसावा अशी अपेक्षा यावेळी मंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्यात व्यक्त केली. यामुळे नंदुरबारमध्ये भाजपला टशन देण्यात सेना मागे राहणार नाही अशी चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आक्रमकपणे पुढे येणार आहे हे आता स्पष्ट होत आहे.
