खेळताना बाजूच्या सोसायटीत गेला बॉल, सुरक्षारक्षकाचं मुलांसोबत भयानक कृत्य, CCTV पाहून होईल संताप

| Updated on: Oct 09, 2025 | 9:50 AM

डोंबिवलीजवळील पलावा सिटीमधील कासा बेला गोल्ड सोसायटीत व्हॉलिबॉल खेळणाऱ्या लहान मुलांना सुरक्षा रक्षकाने क्रूरपणे मारहाण केली. बॉल इमारतीत गेल्याने चिडलेल्या रक्षकाने मुलांचे हात बांधून त्यांना मारले.

डोंबिवलीजवळील हाय-प्रोफाईल पलावा सिटी परिसरातील कासा बेला गोल्ड सोसायटीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉलिबॉल खेळणाऱ्या दोन लहान मुलांना केवळ त्यांचा बॉल इमारतीत गेला म्हणून सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने क्रूरपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कासा बेला गोल्ड सोसायटीत काही लहान मुले व्हॉलिबॉल खेळत होती. हा खेळ सुरू असताना चुकून त्यांचा बॉल शेजारच्या इमारतीत गेला. हा बॉल परत आणण्यासाठी मुले त्या इमारतीच्या दिशेने गेली. याच वेळी त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याने मुलांना अडवले. तुमच्यामुळे गाड्यांचे नुकसान होते! असे ओरडून त्याने मुलांना धमकावले. यानंतर त्याचा संताप आणखी वाढला.

संतप्त झालेल्या खंदारेने आपल्या पदाचा गैरवापर करत दोन्ही लहान मुलांना पकडले. त्यांचे हात मागच्या बाजूला बांधले आणि त्यांना मारहाण केली. हा प्रकार पूर्णपणे अमानुष होता. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तसेच या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पोलिसात तक्रार दाखल

लहान मुलांना मारहाण झाल्याचे समजताच त्यांच्या पालकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षा रक्षकाला जाब विचारला. मात्र, खंदारेने पालकांनाही कोणतीही किंमत न देता त्यांच्यासोबत उद्धट वागणूक देत मुजोरी केली. त्याने पालकांना अरेरावी करत मी कोणाला घाबरत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा! असे सुनावले. यानंतर त्यांना सोसायटीतून बाहेर काढले. या गंभीर घटनेनंतर मुलांच्या पालकांनी वेळ न घालवता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रूर सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारेला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान हाय-प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या सोसायटीत अशा प्रकारे लहान मुलांवर अमानुष वर्तन झाल्यामुळे पलावा सिटी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा रक्षकाकडूनच इतकी क्रूरता पाहायला मिळाल्याने, सोसायटीमधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि रक्षकांच्या प्रशिक्षणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी संबंधित सोसायटी व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

Published on: Oct 09, 2025 09:49 AM