अजित पवारांच्या आमदाराने दत्तक घेतलेले गाव अंधारात, अंत्यसंस्कारासाठीही लाईट नाही, मग ग्रामस्थांनी केलं असं काही… Video समोर

| Updated on: Oct 14, 2025 | 2:55 PM

शिरूर तालुक्यातील गुनाट गावात स्मशानभूमीत वीज नसल्याने एका वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागला. आमदार माऊली कटके यांनी दत्तक घेतलेल्या या गावातील प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

ज्या गावात विकासाची पहाट उजाडणार म्हणून आमदार माऊली कटके यांनी दत्तक घेतले, त्याच शिरूर तालुक्यातील गुनाट गावात प्रशासकीय अनास्थेमुळे घोर अंधार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. गुनाट गावातील स्मशानभूमीत वीज उपलब्ध नसल्यामुळे एका वृद्ध नागरिकाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना चक्क बॅटरी व मोबाईल टॉर्चच्या अंधुक प्रकाशाचा आधार घ्यावा लागला. अंत्यविधीसारख्या गंभीर क्षणी ही बिकट परिस्थिती उद्भवली. यामुळे ग्रामस्थांनी आमदार कटके यांनी दत्तक घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील स्मशानभूमीत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्मशानभूमीत वीज उपलब्ध नसल्याने एका वृद्ध नागरिकाच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांना बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या वापर करावा लागला. त्या अंधुक उजेडात वृद्ध नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार माऊली कटके यांनी दत्तक घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी (१२ ऑक्टोबर) गावातील एका वृद्ध नागरिकाचे निधन झाले होते. नातेवाईकांच्या उपस्थितीत रात्री आठ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने अंत्यविधीच्या वेळेस स्मशानभूमीत विजेची सोय आहे की नाही, याची चाचपणी करणे आवश्यक होते. मात्र, जेव्हा पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले, तेव्हा तेथे काळाकुट्ट अंधार होता. यामुळे काही ग्रामस्थांनी वीज उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.

एकीकडे पार्थिवासमोर शोकाकूल वातावरण, तर दुसरीकडे विजेअभावी रखडलेले अंत्यसंस्कार यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी अखेरीस बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्व अंत्यविधी याच अंधुक प्रकाशात पार पडले. संपूर्ण अंत्यसंस्कार पार पडेपर्यंत ग्रामस्थ व नातेवाईकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून बसावे लागले.

केबलमध्ये बिघाड झाल्याने वीज नाही

याबाबत गुनाटच्या सरपंच रोहिणी गव्हाणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्मशानभूमीत विजेची सोय आहे, मात्र केबलमध्ये बिघाड झाल्याने ऐन वेळेस वीज उपलब्ध होऊ शकली नाही. यापुढील काळात अशी गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान आमदार माऊली कटके यांनी १० महिन्यांपूर्वी ग्रामदैवतांच्या साक्षीने गुनाट गाव दत्तक घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी एकदाही गावाला भेट दिली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत गावातील सोयी-सुविधांचा निधीअभावी असलेला अभाव पाहता दत्तक गावाचे आश्वासन सध्यातरी अधांतरीच असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाने किमान मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Published on: Oct 14, 2025 12:28 PM