आयात उमेदवारांना उमेदवारी देणं भोवलं, थेट पक्षाध्यक्षांकडे तक्रार, बडा नेता संकटात
Samajwadi Party : समाजवादी पार्टीचे 'भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची तक्रार थेट सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उमेदवारीवरून जवळपास सर्वच पक्षांमध्ये नाराजी पहायला मिळाली होती. अशातच आता समाजवादी पार्टीचे ‘भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची तक्रार थेट सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रईस शेख यांचे अखिलेश यादव यांना पत्र
आमदार रईस शेख यांनी राज्यात पार्टीमध्ये सुरु असलेल्या गोंधळाबाबत अखिलेश यादव यांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी राज्यात पार्टीला स्वत:ची जहागीर बनवले असून महानगरपालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली आहे. परिणामी, सपाच्या अनेक कार्यकर्त्यांना नाईलाजाने इतर पक्षाची उमेदवारी घ्यावी लागली असून पक्षात अविश्वास, संघर्ष आणि धुसफूस आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात त्वरीत हस्तक्षेप करावा.’
निष्ठावंत सपा कार्यकर्त्यांना डावलले
आमदार रईस शेख यांनी या पत्रात पुढे म्हटले की, अबु आझमी यांनी भिवंडीमध्ये माझ्यासोबत असलेल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून उमेदवारी नाकारली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 2019 आणि 2024 मध्ये पक्षाला भिवंडीमध्ये विजयी करण्यात भूमिका बजावली त्यांना या निवडणुकीत बाजूला करण्यात आले. अबु आझमी यांनी एककल्ली आणि मनमानी पद्धतीने उमेदवारी दिल्या आहेत.
मुंबईत माझ्याविरोधात पार्टीमध्ये अपप्रचार केला जात आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात येत आहेत. मी म्हणजे पार्टी… अशी प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांची वर्तणूक आहे. एनसीपी आणि शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य उमेदवारांची मुंबईत यावेळी निर्णयक भूमिका असताना समाजवादी पार्टीमध्ये नेत्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालू आहेत. या सर्वांचा फटका यावेळी पार्टीला बसू शकतो, असंही रईस शेख यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
पक्षाचे नुकसान होणार
रईस शेख यांनी पत्रात पुढे म्हटले की, ‘2010 मध्ये भिवंडी पूर्व विधानसभेला अबु आझमी यांच्या मुलगा फरहान आझमी याचा पराभव झाला होता. 2019 मध्ये मला भिवंडी पूर्वमध्ये उमेदवारी दिली गेली, त्यावेळी 1500 मतांनी मी जिंकलो. पाच वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामांमुळे 2024 मध्ये मी 52 हजार मतांनी मी निवडून आलो. भिवंडीत आज समाजवादी मुख्य भूमिकेत आहे. तेथे यावेळी समाजवादीचा महापौर होवू शकतो. मात्र अबु आझमी यांच्या एककल्ली आणि हुकूमशाही पद्धीतीच्या निर्णयामुळे पार्टीला मोठे नुकसान होणार आहे, असंही रईस शेख यांनी म्हटलं आहे.
