बाप रे बाप, ठाण्यातील रुग्णालयात आढळला साप, Video पाहून तुमचीही बोबडी वळेल
ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका रुग्णामुळे मोठी खळबळ उडाली. सर्पदंश झालेल्या रुग्णाने जिवंत साप रुग्णालयात आणला. तो निसटल्याने डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांची पळापळ झाली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांधकाम सुरू असल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालये ही रुग्णांसाठी सर्वाधिक सुरक्षित ठिकाणे मानली जातात. या ठिकाणी डॉक्टर हे देवदूताप्रमाणे रुग्णांना जीवदान देत असतात. मात्र, याच सुरक्षित वातावरणात एखादा अनपेक्षित प्रसंग घडला तर काय होईल? ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोमवारी असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. ज्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. तसेच तिथे मोठी खळबळ माजली.
नेमकं काय घडलं?
सध्या ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम जुने झाल्याने नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानजीक कार्यरत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून रोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येथे येतात. सोमवारी दुपारी रुग्णालयाच्या शेजारील झोपडपट्टीत राहणारा ओंकार राठोड नावाचा एक तरुण सर्पदंश झाल्यामुळे उपचारासाठी दाखल झाला. मात्र तो एकटा नव्हता. त्याला ज्या सापाने दंश केला होता त्या सापाला आपल्या हातात घेऊन तो रुग्णालयात आला. त्याच्या हातात धामण जातीचा जिवंत साप होता.
ओंकार राठोडच्या हातातील जिवंत साप पाहताच उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह, डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची एकच पळापळ सुरु झाली. एखाद्या रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर साप सोबत घेऊन येण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता. विशेष म्हणजे या गोंधळाच्या वातावरणात तो जिवंत धामण साप ओंकारच्या हातातून अचानक निसटला. त्यामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अनेक लोक भीतीने सैरावैरा पळू लागले.
हा साप हातातून निसटल्यानंतर रुग्णालयातील एका कपाटाखाली जाऊन लपला होता. हा साप कपाटाखाली गेल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने सर्पदंश झालेला ओंकार राठोडनेच पुढे होऊन, त्या सापाला पुन्हा पकडले. ओंकारने सापाला पकडल्यानंतरच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तसेच रुग्णांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, सर्पदंश झालेल्या तरुणाने आणलेला साप बिनविषारी धामण जातीचा होता. तो साप निसटल्याने गोंधळ झाला होता. पण या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुण स्वतः तो साप घेऊन रुग्णालयातून निघून गेला. मात्र, ज्या रुग्णालयात वैद्यकीय स्टाफ आणि सुरक्षित वातावरणामुळे रुग्ण येतात, तिथे जिवंत साप घेऊन रुग्ण दाखल होणे आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होणे, ही बाब रुग्णालयाच्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर निश्चितच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.