Maharashtra Breaking News LIVE 6th April 2025 : शिवसंचार सेनेच्या लोगोचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 6 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

संपूर्ण देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात तसेच देशातील अनेक राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिरातही आज रामनवमी साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मोठे आरोप करण्यात आले. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरु झाली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यासह महाराष्ट्र, देश-विदेशातील, क्राडी, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात रामनवमी निमित्त उत्साहाचं वातावरण, भव्य मिरवणूक
पुण्यात रामनवमी निमित्त उत्साहाचं वातावरण
राम नवमी निमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन
पुण्यातील गोखलेनगर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करत डिजेच्या दणदणाटासह भव्य मिरवणूक
-
ठाण्यात पुन्हा भरणार गणेश नाईक यांचा जनता दरबार
फेब्रुवारी महिन्यामध्ये गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली, दरम्यान आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. 11 एप्रिल रोजी काशिनाथ घाणेकर सभागृहात हा जनता दरबार भरणार आहे
-
-
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या सटाणा दौऱ्यावर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या सटाणा दौऱ्यावर सटाणा तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद सटाण्याच्या बिजोटे भागातील नुकसानग्रस्त शेती पिकांची केली पाहणी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश पुढील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – कोकाटे
-
मलाडमध्ये मोठा बंदोबस्त
रामनवमीनिमित्त मलाडमधील मालवणीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी ५०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात असतील. संपूर्ण रॅलीवर ५० हून अधिक पोलिस अधिकारी, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे देखरेख ठेवतील.
-
उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही. सविस्तर वाचा
-
-
वक्फ विधेयकावर नारायण राणे काय म्हणाले?
भाजप खासदार नारायण राणे शिर्डीत पोहचले. त्यांनी वक्फ विधेयकावर प्रतिक्रिया दिली. विरोधकांना त्या कायद्याचा अभ्यास नाही. त्यांनी तो वाचावा. हे विधेयक कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही. वक्फच्या नावाने जो दुरुपयोग चालला होता तो थांबवला जाणार आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
-
उद्धव ठाकरे यांनी सांगितले मोबाईलचे महत्व
काळ हा झपाट्याने पुढे चालला आहे. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, असे शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण करताना सांगितले.
-
सोलापुरात मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, पाठवले बँकेला निवेदन
सोलापुरात मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या अधिकाऱ्यांना मनसेने निवेदन पाठवले आहे. बँकेच्या कामकाजाची नियमावली, फलक आणि संवाद मराठी भाषेत व्हावेत अशी मागणी केली आहे. जर 8 दिवसात याची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.
-
तनिषा भिसे प्रकरणात कुटुंबीयांची मोठी माहिती, रुग्णालयावर गंभीर आरोप
तनिषा भिसे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुटुंबातील सदस्य म्हणाले की, ‘डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्दे साफ खोटे आहे. आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्याबाहेर पडलो होतो. यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, म्हणजे सत्य समोर येईल. तनिषा भिसे यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या. ते कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार.’
-
सोलापुरात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
सोलापुरात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा कृषिमंत्र्यांना काळे फासू असं शिवसेना ठाकरे गटाने इशाराच दिला आहे. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाकरे गटाने निदर्शने केली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून वादग्रस्त केल्याच्या निषेधार्थ आंदोलनही करण्यात आलं. माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-
अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं; पोलिसांकडून तपास सुरु
अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामाला सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणत्या भागात सीसीटीव्ही लागले आहेत तसेच हल्लेखोर कोणत्या मार्गाने गेले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली आहे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला करण्यात आलं.
-
प्रतिआयोध्या असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा करण्यात आला साजरा. भाविकांनी रामजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विधिवत पूजा विधी करून प्रभू रामांचा अभिषेक करण्यात आला. रामाचं वास्तव्य नाशिकमध्ये असल्याने प्रतिआयोध्या म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राम नवमीला काळाराम मंदिरात भाविकांनी स दरवर्षीप्रमाणे प्रचंड गर्दी केली आहे.
-
पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना
पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने रस्त्यावर उडणारी धूळ आणि त्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी फॉग कॅनॉन मशिनचा वापर सुरू केला आहे. पाच वाहनांची खरेदी महापालिकेने केली असून त्याचा वापर विविध भागांत केला जाणार आहे.
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात
पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध पक्ष, संघटना मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्णालयाच्या गेटच्या जवळील बाजूस आणि बाहेरील बाजूस पोलिसांच्या बसेस आहेत. कुठलाही अनुचित प्रकार करू नये यासाठी पुणे पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
-
अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल
अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याप्रकरणी आता शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामाला सुरुवात केली असून आजूबाजूच्या परिसरात कोणत्या कोणत्या भागात सीसीटीव्ही लागले आहेत तसंच हल्लेखोर कोणत्या मार्गाने गेले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड केली होती. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला केला.
-
गोंदिया- बबई इथल्या लग्नसोहळ्यात 25 लोकांना विषबाधा
गोंदिया- बबई इथल्या लग्नसोहळ्यात 25 लोकांना विषबाधा झाली. गरोदर महिलांचा आणि आठ चिमुकलांचाही त्यात समावेश आहे. गोरेगाव इथल्या ग्रामीण रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत.
-
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगडावरील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगडावरील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली आहे. दिव्यांग आणि शेतकरी शेतमजुरांच्या विविध प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी रायगडावर अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यामध्ये दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं, दिव्यांगांची कर्जमाफी करावी, पेरणी ते कापणी पर्यंतची कामे MREGS अंतर्गत करण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, यासह अनेक मागण्या बच्चू कडूंनी सरकारकडे केल्या होत्या.
-
Maharashtra Breaking : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे..
सोन्याच्या भावातही १ हजार १०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ३८०० रुपयांनी घसरण झाली आहे… सोन्याचे दर ८९ हजार ५०० रुपये तोळ्यावर आले तर चांदीचे दर ९० हजार रुपये प्रति किलोवर आले आहे… गेल्या तीन ते चार महिन्यात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे… ट्रम्प सरकार बिटकॉइन खरेदीच्या तयारीत असल्याच्या चर्चेने सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले, असे जाणकारांचे म्हणणं आहे…
-
Maharashtra Breaking : धुळे परिवहन मंडळाच्या वतीने 250 बसेस सप्तशृंगी यात्रोत्सवाला सोडणार…
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणी येथील सप्तशृंगी मातेचा यात्रा उत्सव… यात्रा उत्सवासाठी धुळ्यातून परिवहन महामंडळाचे नियोजन 250 गाड्या सोडणार… धुळ्याहून हजारो भाविक सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला पायी जातात तर काही एसटीने दर्शनासाठी जातात… प्रशासनाने यात्रा उत्सवासाठी दर अर्धा तासाला एक एसटी बस भाविकांसाठी उपलब्ध… आज पासून 17 एप्रिल पर्यंत दररोज बसेसचे नियोजन… 355 एसटी महामंडळाच्या फेऱ्यांचा नियोजन… यात्रेच्या शेवटच्या दिवशी 1288 परतीच्या फेऱ्यांचं एसटी प्रशासनाचे नियोजन..
-
Maharashtra Breaking : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोहरादेवी दौऱ्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचं राजू शेट्टी यांनी केलं होतं शेतकऱ्यांना आवाहन… स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाशिम पोलिसांनी घेतले ताब्यात… पोलिसांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कालच बजावली होती नोटीस… पोलिसांकडू दडपशाही केली जात असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप…
-
पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक
पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली एकाला १२ लाखांना फसवले. ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली एकाने ४८ वर्षीय व्यक्तीची १२ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासाहेब गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. बिबवेवाडी येथील ४८ वर्षीय फिर्यादीला फेब्रुवारी २०२३ मध्ये राहुल गायकवाड याने ईव्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवले. फिर्यादीसाठी आरोपीला १२ लाख रुपये दिले. यानंतर आरोपीने चार्जिंग स्टेशन सुरू न करता तसेच दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केली आहे.
-
पोहरादेवीत रामनवमी उत्सव, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या हस्ते महापूजा केली जाणार
वाशिम : आज पोहरादेवी येथे रामनवमी उत्सव पाहायला मिळत आहे. देशभरातील बंजारा भाविक लाखोंच्या संख्येने पोहरादेवीत दाखल झाले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज महापूजा केली जाणार आहे.
-
पुण्यात मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, महापालिका आयुक्तांच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूचना
पुण्यात मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल आकारण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागास दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच पुणेकरांना ज्या प्रमाणात पाण्याचा वापर, त्या प्रमाणात बिल भरावे लागणार आहे. पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबवण्यासाठी आणि पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे.
-
पुण्यात उन्हाळ्यामुळे पीएमपी बस दुरुस्तीकडे अधिक लक्ष द्या, प्रशासनाला सूचना
पुण्यात उन्हाळ्यामुळे पीएमपी बस दुरुस्तीकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मार्गावर बसचे इंजिन गरम होणे, वायर कट होणे, पॉवर स्टेअरिंग ऑइल लिंक होणे या कारणास्तव बस पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बसला आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे डेपो व्यवस्थापकांनी बसला आग लागू नये म्हणून योग्य देखभाल दुरुस्ती करावी. तसेच, ठेकेदारांना बसला आग लागू नये म्हणून सूचना द्याव्यात, असे आदेश पीएमपीकडून देण्यात आले आहेत. कामकाजामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
-
शिर्डीत रामनवमीचा उत्साह, साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार
शिर्डीतील तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काल काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणा मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात करण्यात आले. साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे 114 वे वर्ष आहे. आज दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आज साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले असणार आहे. लाखो भाविक आज साई समाधीचे दर्शन घेणार आहे. शिर्डीत रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published On - Apr 06,2025 9:05 AM
