दादा, खरे शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारा…; मविआच्या नेत्याचं अजित पवारांना आव्हान
Vaibhav Naik NCP Ajit Pawar Group Andolan : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला अन् अवघ्या महाराष्ट्रभरात संतापाची लाट निर्माण झाली. अजित पवार गटाने मूक आंदोलनाची भूमिका घेतलीय. यावरूनच मविआच्या नेत्याने अजित पवारांना आव्हान दिलंय. वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण उद्घाटनानंतर आठ महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून सध्या वातावरण तापलं आहे. अशातच सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ज्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर अजित पवार गटाकडू मूक आंदोलन करण्यात येणार आहे. अजित पवारांनी काल बोलताना, शिवरायांचा पुतळा कोसळला ही गंभीर बाब आहे. राज्यातील 13 कोटी जनतेची मी जाहीर माफी मागतो म्हटलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याने अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलं आहे.
मविआच्या नेत्याचं अजित पवारांना आव्हान
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार वैभव नाईक यांनी अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी आंदोलन करावं. शिवप्रेमी म्हणून त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं धाडस दाखवायला हवं. अजित पवारांनी सत्तेवर लाथ मारली पाहिजे. अशी नौटंकी करून चालणार नाही. खरंच शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारा, असं वैभव नाईक म्हणालेत.
कालच्या राड्यावर वैभव नाईकांची प्रतिक्रिया
जयंत पाटील, आदित्य ठाकरे काल राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर तिथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला. यावरही वैभव नाईकांनी भाष्य केलं. कालचा राडा गृहखात्याने संगनमताने झाला होता. कुठल्यातरी प्रकरणात आम्हाला अडकवायचंच होतं. राणेंचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, गृहखातं त्यांच्या हातचं बाहुले झालं आहे. त्यामुळे हे गुन्हे आमच्यावर दाखल होतील, याची आम्हाला जाणीव आहे. अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही, असं ते म्हणालेत.
राणेंविरोधात तक्रार करणार- नाईक
नारायण राणेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. त्याविरुद्ध पोलीस स्थानकात मी तक्रार दाखल करणार आहे. याआधी ही माझे काका श्रीधर नाईक यांची अशीच हत्या झाली होती आणि त्यात नारायण राणे मुख्य आरोपी होते. तक्रार दाखल करून आम्हाला न्याय मिळणार नाही हे माहिती आहे, असं वैभव नाईक म्हणाले आहेत.
