Patanjali: पतंजली योगपीठाचा कौतुकास्पद उपक्रम, 250 दिव्यांगांना मिळाले मोफत कृत्रिम अवयव
पतंजली वेलनेस आणि उद्धार जेफरीज नागपूर यांनी पतंजली योगपीठात संयुक्तपणे एका शिबिराचे आयोजन केले होते. या दोन दिवसांच्या शिबिरात दिव्यांग लोकांना मोफत कृत्रिम अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली वेलनेस आणि उद्धार जेफरीज नागपूर यांनी पतंजली योगपीठात संयुक्तपणे एका शिबिराचे आयोजन केले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या शिबिर आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या शिबिरात दिव्यांग लोकांना मोफत कृत्रिम अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. या जनसेवा शिबिरात 250 हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, क्रॅच या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. आता दर तीन ते चार महिन्यांनी हे शिबिर आयोजित केले जाणार आहे.
ही सहानुभूती नाही तर सक्षमीकरण – रामदेव बाबा
या शिबिरावेळी पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा आणि महासचिव आचार्य बालकृष्ण उपस्थित होते. यावेळी दोघांनीही लाभार्थ्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित केले. रामदेव बाबा म्हणाले की, ‘हे लाभार्थी दिव्यांग नाहीत तर दिव्य आत्मे आहेत. त्यांना सहानुभूतीची नाही तर सक्षमीकरणाची आवश्यकता आहे.’
लोकांना स्वावलंबी बनवणे हे पतंजलीचे उद्दिष्ट
आचार्य बालकृष्ण यांनी यावेळी दिव्यांगजनांशी संवाद साधला आणि म्हटले की, ‘पतंजलीचे उद्दिष्ट केवळ आयुर्वेदिक औषधे देणे नाही, तर प्रत्येक मानवाला स्वावलंबी बनवणे हे आहे, ही आमची राष्ट्रीय सेवा आहे. भगवान महावीर विकलांग सहाय्य समिती, उद्धार सेवा समिती, अनुभवी डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पतंजली सेवा विभागातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या मदतीने या शिबिराचे आयोजन केले होते.

पतंजली योगपीठाचा खास उपक्रम
या शिबिरात दिव्यांग लोकांना अवयव देण्यात आले, तसेच या कृत्रिम उपकरणांचे फिटिंगबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामुळे फक्त शारीरिक मदत झाली नाही, तर यामुळे दिव्यांगजनांचा आत्मविश्वास देखील बळकट झाला. पतंजली योगपीठाच्या या शिबिरातून पतंजलीची मानव सेवा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली तळमळ दिसून येते.
या योग शिबिरात स्वामी विदेहदेव, स्वामी पुण्य देव, भगिनी पूजा यांच्यासह उद्धार संघ व्यवस्थापनाच्या लोकांनी सहभाग घेतला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय, रुचिका अग्रवाल, श्रुती, प्रद्युमन, रवी, दिव्यांशु, कृष्णा, निहारिका, दिव्या, दीनदयाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
