Operation Sindoor : मोदींमध्ये इंदिरा गांधींसारखा 50 टक्के जरी दम असेल तर…राहुल गांधींचे खुले आव्हान!
ऑपरेशन सिंदूरवर बोलताना राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मोदी यांना आव्हान दिले आहे. इंदिरा गांधी यांचाही त्यांनी उल्लेख केलाय.

ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला यावर संसदेत चर्चा होत आहे. सोमवारपासून (28 जुलै) चालू झालेल्या या चर्चेत साधक-बाधक चर्चा होत आहे. हे ऑपरेशन राबवताना सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक, मोदी सरकारचे धोरण यावर विरोधक बोट ठेवत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दरम्यान, आज (29 जुलै) खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारची लक्तरं काढली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलतना मोदींमध्ये इंदिरा गांधीच्या तुलनेत 50 टक्के जरी हिंमत असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असं जाहीर करावं, असं थेट आव्हानच दिलंय.
युद्धादरम्यान नेमकं काय घडलं होतं?
पहलगावरील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. भारताने हवाई हल्ल्यात अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, असा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ले केले होते. दरम्यान, दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने मध्यस्थी केली होती. तसेच एकमत झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी झाल्याचे जाहीर केले होते. हाच मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला. त्यांनी मोदींना थेट आव्हान दिले.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवर भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं की मी शस्त्रसंधी घडवून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, हे सभागृहात सांगावं. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी धमक दाखवावी. इंदिरा गांधी यांच्या तुलनेत मोदींमध्ये 50 टक्केजरी दम असले तर त्यांनी ट्रम्प खोटारडे आहेत, हे सांगावं, असं खुलं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं.
लोकसभा अध्यक्षांनी रोखलं, पण….
राहुल गांधी यांच्या या आव्हानानंतर सभागृहात गोंधल उडाला. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सर मला बोलू द्या. आता तर मी ओपनिंग केली आहे. मला थोडी मुभा द्या, असे सांगत दम असेल तर पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, हे संध्याकाळीच सभागृहात सांगावं, असे आव्हान पुन्हा दिले.
दरम्यान, आता राहुल गांधी यांचे आव्हान नरेंद्र मोदी स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
