Ashes Series 2025 : एका झटक्यात 2 मॅचविनर बॉलर बाहेर, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला झटका
Australia vs England Ashes Series 2025: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा बुधवार 17 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे मॅनविनर बॉलर या मालिकेतून बाहेर झाले आहेत.

प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये इंग्लंडची वाईट स्थिती झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ आणि ब्रिस्बेनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 8 विकेट्सने मात केली. ऑस्ट्रेलियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इथून इंग्लंडचं मालिका जिंकणं अवघड असल्याचं स्पष्ट आहे. तसेच इंग्लंडला ही मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर कोणत्याही स्थितीत 2 सामने जिंकावे लागणार आहेत. इंग्लंडला अशी अटीतटीची स्थिती असताना मोठा झटका लागला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. एशेस सीरिजमधील उर्वरित 3 सामन्यांमधून 2 वेगवान गोलंदाज बाहेर झाले आहेत. दुखापतीमुळे या गोलंदाजांना मालिकेला मुकावं लागलं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या गोलंदाजाला या मालिकेतून आऊट व्हावं लागलंय. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडच्या मार्क वूड याला दुखापतीमुळे उर्वरित 3 सामन्यांना मुकावं लागलं आहे. तर इंग्लंडच्या गोलंदाजांना बॉलिंगने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या जोश हेझलवूड याची दुखापतीने विकेट काढली आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मार्क वूडला काय झालं?
मार्क वूड याच्या गुडघ्याला दुखापत झालीय. वूडला गुडघ्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. वूडला पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती. वूड या आठवड्यातील अखेरीस मायदेशी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. वूड लवकर रिहॅबला सुरुवात करणार असल्याचंही समजत आहे.
जोश हेझलवूड याला आणखी 1 दुखापत
जोश हेझलवूड याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जोशला हॅम्स्ट्रिंगमुळे पहिल्या 2 कसोटी सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यात जोशला आणखी एक दुखापत झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे कोच अँड्रयू मॅक्डॉनल्ड यांनी दिली.
इंग्लंडला तगडा झटका, अडचणीत वाढ
Absolutely gutted for you, Woody.
After working so hard to get back, we’re all with you ❤️
— England Cricket (@englandcricket) December 9, 2025
इंग्लंडसाठी तिसरा सामना ‘करो या मरो’
दरम्यान इंग्लंडसाठी तिसरा कसोटी सामना हा करो या मरो असा असणार आहे. इंग्लंडला आव्हान कायम राखायचं असेल आणि एशेज मालिका गमवायची नसेल तर कोणत्याही स्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 17 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे एडलेड ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे.
