IND vs SA: शुक्रवारी भारताच्या 9 खेळाडूंचं खास पदार्पण फिक्स, शुबमनचाही समावेश, आणखी कोण? कोलकातात काय होणार?
India vs South Africa 1st Test : क्रिकेट चाहत्यांमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी उत्साहाचं वातावरण आहे. हा पहिला सामना भारताच्या 9 खेळाडूंसाठी खास ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. कसोटी मालिकेचा 14 नोव्हेंबरपासून श्रीगणेशा होत आहे. पहिला सामना हा कोलकातामधील ऐतिहासिक अशा इडन गार्डन्समध्ये होणार आहे. तब्बल 6 वर्षांनंतर या मैदानात कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना भारताच्या तब्बल 9 खेळाडूंसाठी खास आणि अविस्मरणीय असा ठरणार आहे. या सामन्यातून भारताच्या 1-2 नाहीत तर 9 खेळाडूंचं खास पदार्पण होणार आहे. या 9 खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश आहे.
बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या 15 मधून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला पहिल्या कसोटी सामन्यातून मुक्त करण्यात आले. त्यात आता 14 पैकी असे 2 खेळाडू आहेत ज्यांनी ईडन गार्डन्समध्ये कसोटी सामना खेळले आहेत. केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा या दोघांनाच इडन गार्डन्समध्ये कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे. या दोघांना पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
तसेच केएल आणि जडेजा या दोघांचा अपवाद वगळता भारतीय संघातील उर्वरित 12 खेळाडूंना या मैदानात याआधी एकही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे या 12 खेळाडूंपैकी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणाऱ्या 9 खेळाडूंचं या मैदानात खास पदार्पण होणार असल्याचं निश्चित आहे.
ते 9 खेळाडू कोण असणार?
कोलकातातील या मैदानात कसोटी पदार्पण करणाऱ्या 9 खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश असू शकतो? हे जाणून घेऊयात. प्लेइंग ईलेव्हनमधील 11 पैकी 9 खेळाडूंमध्ये कॅप्टन शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असू शकतो.
नितीश कुमार रेड्डी पहिल्या सामन्यातून मुक्त
दरम्यान टीम इंडियाचा युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या अनऑफीशियल वनडे सीरिजसाठी रिलीज करण्यात आलं आहे. नितीश कुमार रेड्डी दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात असणार, अशी माहिती बीसीसीआयने बुधवारी 12 नोव्हेंबरला दिली.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
