IPL 2026 : 19 व्या मोसमातून अखेर पहिला संघ अधिकृतरित्या आऊट, कुणाचं पॅकअप?
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants : ऋषभ पंत याच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सचं 19 व्या मोसमातून आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनौची या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौवर दणदणीत विजय मिळवला. लखनौने या सामन्यात चेन्नईसमोर 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान एकतर्फी फरकाने पूर्ण केलं आणि 2 गुणांची कमाई केली. लखनौने चेन्नईसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान 4 बॉलआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईने 19.2 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या. चेन्नईचा हा या मोसमातील 6वा विजय ठरला. चेन्नईच्या खात्यात यासह एकूण 12 गुण झाले आहेत.
लखनौ सुपर जायंट्सचा बाजार उठला
उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या 53 व्या सामन्यानंतर 19 व्या मोसमातून अधिकृतरित्या पहिला संघ बाहेर झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सचं पराभवासह प्लेऑफच्या शर्यतीतून आव्हान संपुष्टात आलं याहे. त्यामुळे आता प्लेऑफमधील 4 जागांसाठी 9 संघात चुरस असणार आहे.
लखनौने 7 मे रोजी 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात आरसीबी विरुद्ध डीएलएसनुसार 9 धावांनी विजय मिळवला. लखनौसाठी आरसीबी विरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. लखनौने हा सामना जिंकून आव्हान कायम राखलं होतं. मात्र लखनौला जर तरचं आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित सामने जिंकणं बंधनकारक होतं. मात्र चेन्नईने लखनौला पराभूत केलं. यासह लखनौचं स्पर्धेतून पॅकअप झालं.आता लखनौचा उर्वरित सामने जिंकून मोसमाचा सन्मानाने शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे.
लखनौची 19 व्या मोसमातील कामगिरी
लखनौने 19 व्या मोसमात एकूण 11 सामने खेळले आहेत. लखनौला या 11 पैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर लखनौचा 8 सामन्यांत पराभव झाला आहे. लखनौच्या खात्यात एकूण 6 गुण आहेत. तर लखनौचा नेट रनरेट हा -0.907 असा आहे.
लखनौचा सामना केव्हा?
दरम्यान लखनौसमोर आता पुढील सामन्यात पुन्हा चेन्नई सुपर किंग्स टीमचं आव्हान असणार आहे. हा सामना 15 मे रोजी होणार आहे. त्यानंतर लखनौ राजस्थान रॉयल्स विरुद्ध 2 हात करेल. तर लखनौचा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना हा 23 मे रोजी खेळवण्यात येईल. लखनौ या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध भिडेल. लखनौचा हा सामना जिंकून मोहिमेचा शेवटने विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे.
