मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; विशेष न्यायालयात उद्या निकाल लागणार?
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात उद्या मुंबई उच्च न्यायालयात निकाल जाहीर होणार आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह ७ आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा मागितली आहे. या स्फोटात 6 जण मृत्युमुखी पडले होते आणि शेकडो जखमी झाले होते. या प्रकरणाची सुनावणी 17 वर्षे चालली आहे आणि आता निकालाला सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल उद्या मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बॉम्बस्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास प्रथम दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला. गेल्या 17 वर्षांपासून मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी एनआयएने साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात संशयितांना मृत्युदंडाची मागणी केली होती. उद्या या खटल्याचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, मालेगावसह संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.
