Kelve समुद्र किनारी 6 जण बुडाले; चौघांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील कॉलेज तरुणांचा मोठा ग्रुप पिकनिकसाठी आला होता. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडू लागली.
पालघर / मोहम्मद हुसेन (प्रतिनिधी) : केळवे समुद्रकिनाऱ्या (Kelve Beach)वर 6 जण बुडाल्या (Drowned)ची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. चौघांचे शव बाहेर काढण्यात आले आहेत. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेली दोन स्थानिक लहान मुले बुडत होती. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले नाशिकचे चार तरुणही समुद्रात बुडाले. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांनी युद्धपातळीवर शोध घेत चारही मृतदेह बाहेर काढले. बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील कॉलेज तरुणांचा मोठा ग्रुप पिकनिकसाठी आला होता. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडू लागली. नाशिकच्या या तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले. मुलं बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर यातील 4 तरुण या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेले. मात्र हे चौघेही पाण्यात बुडाले.
