Sangli Land Dispute : 80 वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली? सरकारी पेन्शनचं आमिष, अंगठ्यांचे ठसे अन्…
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर एका वृद्ध महिलेची 17 एकर जमीन लाटल्याचा आरोप होतोय. सांगलीमधल्या एका 80 वर्षाच्या आजीने याबद्दल मुंबई सुद्धा गाठली. सरकारी पेन्शन देतो म्हणून आपले अंगठे घेतल्याचा आरोप वृद्ध महिलेने केलेला आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावावर एका वृद्ध महिलेची 17 एकर जमीन लाटल्याचा आरोप होतोय. आरोपानुसार विविध सरकारी योजनांचा लाभ देऊन पेन्शन देतो असं आमिष दाखवून आजीला सरकारी कार्यालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथेच अंगठे घेऊन आजींची 17 एकर जमीन लाटली गेल्याचा आरोप आहे. अधिवेशनाच्या वेळेला आजीसह तिचे काही हितचिंतक विधीमंडळात आंदोलनासाठी पोहोचले होते. संबंधित कुटुंब माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यापासून कुटुंबियांना रोखत दुसरीकडे नेलं.
आजीचं नाव विठाबाई पडळकर असून त्यांच वय 82 च्या आसपास आहे. आरोपानुसार गोपीचंद पडळकरांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्या वतीने कैलास वाघमारे नावाचा इसम जमिनीचे व्यवहार करतो. त्यांनीच स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आजीला खोटं आश्वासन दिलं आणि जमीन लुबाडून घेतली. गावात बोंब उठल्यानंतर बँक खात्यामध्ये पाच लाख टाकण्यात आले मात्र आता फसवणुकीची कोणीही तक्रार घेत नसल्याचा आरोप आजी करताय. पडळकरांनी या व्यवहारशी आमचा संबंध नसल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे सभागृहातही या प्रकरणाचे पडसाद उमटलेत.
