पुढील 50 वर्षांचा विचार करून पुण्याचा विकास : अजित पवार

| Updated on: Jul 30, 2021 | 8:52 AM

आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथं दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता" असं अजित पवार यांनी सांगितलं.

Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुणे मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली.

“सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला? तर सकाळी सुरुवात चांगली होते. कोरोनाचं संकट आहे, आम्हीच नियम करायचे, अन् मोडायचे कसे? गर्दी नको म्हणून मी सकाळी 6 ला घ्या म्हटलं होतं, पण दीक्षित म्हणाले 7 ला घेऊ. इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको. म्हणून कार्यक्रम लवकर घेतला. आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथं दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता” असं अजित पवार यांनी सांगितलं.

निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुणेकरांचे आभार मानतो, ही काम सुरु असताना पुणेकरांनी संयम दाखवला, अशा शब्दात अजितदादांनी पुणेकरांचे आभार मानले. पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला कालच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दोन रिंग रोड, 10 मेट्रो मार्गिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, या सगळ्या कामाला 75 कोटी रुपये लागतात, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.