Chunabhatti Sion Protest : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला…. घडलं काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना चुनाभट्टीजवळ रिक्षातून पुढे जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे अनुयायांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अडवला, ज्यामुळे मुंबईत साडेतीन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनुयायांनी ‘जीआर दाखवा किंवा सोडा’ अशी मागणी केली.
मुंबईतील चुनाभट्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी रस्ता रोको आंदोलन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे जाण्यासाठी आलेल्या रिक्षांना पोलिसांनी चुनाभट्टीच्या हद्दीत अडवल्याने हा वाद निर्माण झाला. परिणामी, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे मुंबईकरांना साडेतीन तासांहून अधिक काळ त्रासाला सामोरे जावे लागले. घाटकोपरपासून चेंबूरपर्यंतच्या मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंबेडकर अनुयायांनी, “रिक्षांना पुढे जायची परवानगी नाकारायची होती, तर आधीच सूचना का दिली नाही?” असा सवाल विचारत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर टीका केली. त्यांनी पोलिसांना जीआर (सरकारी अध्यादेश) दाखवण्याची मागणी केली, अन्यथा त्यांना दादरपर्यंत जाऊ देण्याची विनंती केली. आंदोलनादरम्यान डीसीपी समीर शेख यांच्यासह पोलीस अधिकारी माध्यमांशी बोलण्यास तयार नव्हते. वाहतूक कोंडीमुळे एसटी, बेस्ट बस आणि खाजगी वाहने अडकून पडली होती.
