Indias Exports : भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने परत पाठवले, पण का? 10 वर्षात पहिल्यांदाच असं काय घडलं?
जवळपास ५० लाखाच्या घरात भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहेत. अशातच भारतीय आंब्याला अमेरिकेत मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. मात्र आता भारताकडून निर्यात करण्यात आलेले तब्बल 4 कोटी रूपयांचे आंबे US कडून नाकारण्यात आलेत.
भारतातून निर्यात झालेले तब्बल 4 कोटी रूपयांचे आंबे अमेरिकेने नाकारले असल्याचे समोर आले आहे. तब्बल चार कोटी 28 लाख रूपयांचा आंबा अमेरिकेतील विमानतळावर थांबवण्यात आलाय. यानंतर भारतातून निर्यात झालेले 4 कोटींची आंबे अमेरिकेने का नाकारले असतील? अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच याचं कारण समोर आलं आहे. रेडिएशन प्रक्रियेशी संबधित कागदपत्रांमधील त्रुटींमुळे आंबा स्वीकारण्यास अमेरिकेकडून नकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर यानंतर पणन मंडळाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दहा वर्षात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या आंब्याच्या 15 खेपा परत पाठवल्या आहेत, तर काही नष्ट केल्या आहेत. अमेरिकेने नाकरलेल्या या आंब्यांची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर ही आंब्याची वाहतूक थांबवण्यात आल्याची माहिती मिळतेय.
