बायको-आईच्या नावाने डान्सबार काढून बायका नाचवता; पुरावे दाखवत परब यांचा कदमांवर हल्लाबोल
शिवसेना (उबाठा) पक्षाचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित ‘सावली’ डान्सबार प्रकरणावरून टीका केली.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित ‘सावली’ डान्सबार प्रकरणावरून तीव्र टीका केली. कांदिवली येथील या बारच्या माध्यमातून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. परब म्हणाले, गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, यावर कारवाई कोण करणार? अशा ठिकाणी मुली नाचवून अश्लीलता पसरवण्याची लाज वाटत नाही का?
परब यांनी सांगितले की, सावली बारवर यापूर्वी दोनदा कारवाई झाली आहे, परंतु कदम पितापुत्रांनी हा बार इतरांना चालवायला दिल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर परब यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, मी आज फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना या प्रकरणातील सर्व पुरावे भेट म्हणून देणार होतो, पण ते आज मुंबईत नाहीत. उद्या ते परतल्यानंतर मी त्यांना सर्व कागदपत्रे सादर करेन. सावली बार कदम यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचे मान्य असले, तरी येथे डान्सबारचे सर्व नियम धुडकावले गेल्याचा आरोप परब यांनी केला. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
