Shivsena : किल मीच्या ऐवजी सेव्ह मी म्हटलं असतं तर…, शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम येथे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे षण्मुखानंद येथे साजरा करत दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली.
ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात युवा शिवसेनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहे आहे. शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या मेळाव्यात कम ऑन किल मी असा उल्लेख भाषणात केला होता आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदेंचा अनाथांचा नाथ एकनाथ असा उल्लेख करत कम ऑन किल मीच्या ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते. एकनाथ शिंदे हे मारणाऱ्यातील नसून तारणाऱ्यातील आहेत, असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची ठाण्यात एकच चर्चा होतेय.
‘मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी.. असेल हिंमत तरी या अंगावर… फक्त अंगावर येणार असेल अँबुलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल.’ असं शिवसेनेच्या मेळाव्यात प्रहार सिनेमाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला होता.
