Bihar Election Result : निकालानंतर लालूंच्या घरात नेमकं चाललंय काय? तेजस्वी यादव अन् रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठा संघर्ष सुरू झाला आहे. निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १५ नोव्हेंबरला, लालू प्रसाद यादवांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव आणि त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्यात तीव्र वाद झाला. या भांडणानंतर रोहिणी आचार्य यांनी थेट राजकारण सोडण्याची घोषणा करत पटनामधील घर सोडले आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या.
रोहिणी यांनी तेजस्वी यांना निवडणुकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारला. त्यांनी आरजेडीचे राज्यसभा खासदार संजय यादव आणि तेजस्वी यादव यांचा मित्र रमीज यांना पराभवासाठी जबाबदार धरले. रोहिणींच्या म्हणण्यानुसार, या वाद दरम्यान त्यांना अपमानित करण्यात आले आणि धक्काबुक्कीही झाली, त्यानंतर त्या रडत घराबाहेर पडल्या. रोहिणींच्या बहिणी राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा यांनीही नंतर दिल्ली गाठली. या घटनेने लालूंच्या घरातील अंतर्गत कलह सार्वजनिक झाला आहे.
