Pankaja Munde PA Wife Death : तुमच्या मुलीची माझ्यासमोर फाशी अन् ती गेली.. मामानं गौरीच्या त्रासाबद्दल सगळंच सांगितलं

Pankaja Munde PA Wife Death : तुमच्या मुलीची माझ्यासमोर फाशी अन् ती गेली.. मामानं गौरीच्या त्रासाबद्दल सगळंच सांगितलं

| Updated on: Nov 23, 2025 | 12:36 PM

पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीचे निधन ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी यांचा विवाह झाला होता. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गौरी गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या आई-वडिलांना आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणींबद्दल सांगत होती. मात्र, तिने नातेवाईकांना याबद्दल काहीही सांगितले नव्हते. तिचे आई-वडील सुरुवातीला “मुलगी नांदते आहे, सर्व ठीक होईल” असे मानत होते. परंतु, घटनेच्या आदल्या रात्रीपासून (एक वाजल्यापासून) त्यांच्यात भांडणे सुरू होती असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. रात्री आठ वाजता गौरीच्या वडिलांना फोन आला आणि त्यानंतर आईला फोन करून “तुमच्या मुलीने माझ्यासमोर फाशी घेतली आणि ती गेली” असे सांगण्यात आले.

गौरीला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यानंतर अनंत गर्जे तिला सोडून निघून गेल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. मुलीच्या आई-वडिलांना निदान भांडणे झाली आहेत, तुम्ही या, असे कळवण्याची गरज होती, असे त्यांचे म्हणणे आहे. बीड येथून ते रडत-रडत मुंबईला पोहोचले. सकाळी एफआयआर नोंदवण्यात आला, त्यानंतर अनंत गर्जे यांनी पसार होण्याचा प्रयत्न का केला, असा प्रश्नही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. गौरीला अनंतच्या काही पर्सनल गोष्टी माहिती झाल्याने तो तिला टॉर्चर करत होता, असा गंभीर आरोप तिच्या मावशीने केला आहे. त्यांचे लग्न आठ महिन्यांपूर्वी झाले होते.

Published on: Nov 23, 2025 12:36 PM