Pune Floods : चालकाचं धाडस अंगलट, भीमेच्या पाणी पातळीत वाढ, नदीपात्रात गेली कार वाहून अन्….
पुण्यातील खेड तालुक्यात भीमा नदीपात्रात एक कार वाहून गेली असून, त्यात तीन जण असल्याची भीती व्यक्त होत आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असतानाही चालकाने कार नेण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडली.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे भीमा नदीपात्रात एक कार वाहून गेली. या घटनेत कारमध्ये तीन जण असल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना पुण्यातील खेड तालुक्यात असलेल्या चास टोकेवाडी पुलावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. भीमा नदीचे पाणी पुलावरून वाहत असतानाही कार चालकाने धोका पत्करून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात कार पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडली आणि वाहून गेली.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, कार नदीच्या पाण्यात वेगाने वाहून जाताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. या कारमध्ये नेमके कोण होते आणि त्यांची नेमकी संख्या किती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही, मात्र तीन जण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक प्रशासन आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
