Mumbai Local Disruption: ऐन गर्दीच्या वेळेला लोकल ठप्प, मध्य रेल्वेची सेवा कुठं विस्कळीत? नेमकं काय झालं?
मुंबईत मध्य रेल्वेच्या विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील रुळाला तडा गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा खोळंबली. प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून, 10-15 मिनिटे उशीर होत आहे.
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विक्रोळी आणि कांजुरमार्ग दरम्यानच्या डाऊन धीम्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळेत सकाळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे हजारो मुंबईकर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीर झाल्याने त्यांची गैरसोय झाली. या घटनेमुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यानही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. परिणामी, मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
सकाळी 7 वाजून 32 मिनिटांपासून ते 7 वाजून 58 मिनिटांपर्यंत धीम्या मार्गावरील लोकल सेवा खोळंबली होती. या काळात धीम्या मार्गावरील लोकल गाड्या माटुंगा येथून जलद मार्गावर वळवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या सध्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
