मुंबई तोडण्याची भाषा अन् काढला एकमेकांचा बाप, फडणवीस-राऊतांमध्ये वार-पलटवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई तोडण्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यावरून पलटवार करत आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आगामी महापालिका निवडणुका सुरू होण्यापुर्वी मुंबई तोडण्याची भाषणं आता पुन्हा सुरु होतील, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. पुढे फडणीस असेही म्हणाले की, ‘आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यात. आशिष शेलार आता पुन्हा एकदा महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालाय, अशी भाषणं सुरू होतील. पण तुमच्यातही नाही आणि कोणाच्या बापातही मुंबई तोडण्याची ताकद नाही’, असं फडणवीस म्हणाले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केलाय.
मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदीं-शाहांचा दबाव असल्याचं राऊत म्हणाले. इतकंच नाही तर फडणवीसांवर मोदीं-शाहांचा दबाव असल्याने त्यांच्या स्वप्नातही मुंबई येते, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. ‘तुमचाच दिल्लीतील बाप मुंबई तोडण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई कमजोर करण्याची आणि लाडक्या उद्योगपतींच्या घशात मुंबई घालण्याची आणि तोडण्याची हिंमत दिल्लीतील बाप तेच करताय’, असा निशाणा राऊतांनी साधलाय.
