TBM launch Mumbai : ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हवर भूमिगत रस्ता होणार.. शिंदे-फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ, फायदा नेमका काय?
मुंबईतील ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. सुमारे सव्वा नऊ किलोमीटर लांबीचा हा भूमिगत मार्ग वाहतूक कोंडी कमी करून पूर्व-पश्चिम उपनगरं जोडणार आहे. टनेल बोअरिंग यंत्राद्वारे (TBM) हे काम पूर्ण होईल, ज्यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
मुंबईतील वाहतूक समस्या कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दरम्यानच्या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या पहिल्या टनेल बोअरिंग यंत्राला (TBM) ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्टमधून भूगर्भात सोडण्यात आले.
हे टीबीएम ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दरम्यान सुमारे सव्वा नऊ किलोमीटर लांबीचे भूमिगत मार्ग तयार करेल. या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल. यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अमीन पटेल यांच्यासह एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी मुद्गल आणि उपमहानगर आयुक्त अजिंक्य पडवाळ उपस्थित होते. हा प्रकल्प मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, अटल सेतू आणि वांद्रे-वरळी सी लिंक यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधांना एकसंधपणे जोडणार आहे, ज्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल.