Parth Pawar Land Deal : अजितदादा अडचणीत! पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटीत अन् स्टॅम्प ड्युटी फक्त…
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर पुण्यातील 43 एकर वतनाची जमीन 1800 कोटींऐवजी केवळ 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अमेडिया कंपनीने अपेक्षित 21 कोटींऐवजी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा आहे. आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 43 एकर वतनाची जमीन 1800 कोटी रुपये मूल्याची असताना, केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. हा व्यवहार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीमार्फत करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या जमीन खरेदीसाठी 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ 500 रुपये भरण्यात आल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, उद्योग संचालनालयाने 48 तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचाही आरोप होत आहे. वतनाची जमीन खरेदी करण्यासाठी शासनाची विशेष परवानगी आवश्यक असते, असे नियमांचे अभ्यासक सांगतात. अमेडिया कंपनीने या जागेवर आयटी पार्क उभारण्याची योजना आखली होती आणि आयटी धोरणाचा लाभ घेऊन त्यांना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा आरोप आहे.
महत्वाचे म्हणजे, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे भाग भांडवल केवळ 1 लाख रुपये असताना, त्यांनी 300 कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या जमीन व्यवहार प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया कंपनीला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीद्वारे कंपनीला 2 टक्क्यांप्रमाणे 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
